अहमदनगर बातम्या

व्यापार्‍याने शेतकर्‍याची केली 14 लाखांची फसवणूक; पोलिसांनी असा लावला छडा, पैसेही मिळाले परत

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar News :- व्यापार्‍याने शेतकर्‍याकडून 14 लाख 50 हजार रूपयाचा संत्र्या खरेदी केल्या. मालाचे पैसे शेतकर्‍याच्या खात्यावर ‘आरटीजीएस’ केले अन् माल ताब्यात येताच शेतकर्‍याचे बँक खाते होल्ड करून फसवणूक केली.

याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी तिघांविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली. 14 लाख 50 हजार रूपये शेतकर्‍यास परत मिळून दिले आहे.

अमोल ज्ञानेश्‍वर फुटाणे (रा. सिंधुरजनाघाट ता. वरूड जि. अमरावती), मायनुल इसलाम करीम इस्लाम (रा. जेलियाखाली ता. संदेशखाली जि. नाँर्थ 24 परगाना, पश्‍चीम बंगाल), एम. डी. कलीमोद्दीन (रा. एअरपोर्टजवळ, कलकत्ता, पश्‍चीम बंगाल) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शेतकरी संदीप मधुकर तावरे (वय 37 रा. वाळकी ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमोल फुटाणे व मायनुल इस्लाम या दोघांना अटक केली आहे.

त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. संदीप तावरे यांनी पश्‍चीम बंगाल मधील व्यापार्‍यांना संत्रा विक्री केली होती. व्यापार्‍यांनी 14 ते 17 फेब्रुवारी 2022 दरम्यान संत्र्या ट्रकमध्ये भरल्या.

संत्राच्या गाड्या भरल्यानंतर त्यांनी शेतकरी तावरे यांच्या बँक खात्यावर 14 लाख 50 हजार रूपयाचे आरटीजीएस केले. पैसे पाठविल्याबाबत बँकेचे संदेश तावरे यांना प्राप्त झाला.

पैसे खात्यावर आलाचा संदेश तावेर यांना मिळाल्याने त्यांनी संत्र्यांनी भरलेल्या ट्रक सोडल्या. गाड्या महाराष्ट्र राज्याबाहेर गेल्यानंतर सदर व्यापार्‍यांनी तावरे यांचे बँक खाते होल्ड केले.

त्यामुळे तावरे यांना त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढता आले नाहीत. फसवणूक झाल्याचे तावरे यांच्या लक्षात येताच त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेत तपास सुरू केला.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक युवराज चव्हाण, महिला पोलीस नाईक गायत्री धनवडे, विक्रांत भालसिंग, विशाल टकले यांनी तांत्रिक तपास करून आरोपीचा शोध घेत त्यांना अटक केली.

शेतकर्‍याचे 14 लाख 50 हजार रूपये परत मिळून दिले. शेतकर्‍याने आपल्या मालाचा व्यवहार करताना सतर्कता बाळगावी. व्यापार्‍यावर लगेचच विश्वास न ठेवता सतर्कतेने व बारकाईने व्यवहार करावेत, असे आव्हान नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केले आहे.

Ahmednagarlive24 Office