Ahmednagar News : अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती आहे. गेल्या १० दिवसांत कोपरगांवाचा सरासरी सुर्याचा पारा ४० अंशाच्या आसपास राहिला. यात बुधवार (दि. १७) हा या हंगामातील सर्वात उष्ण दिवस ४१.२८ अंश सेल्सियस नोंदवला गेला.
गेल्या आठवडाभरातील कोपरगावचे तपमान असे राहिले, ८ एप्रिल (३९.२३), ९ एप्रिल (३९.२४), १० एप्रिल (४०. २६), ११ एप्रिल (४१.२६), १२ एप्रिल (३९.२७), १३ एप्रिल (३९.००), १४ एप्रिल (३९.२५), १५ एप्रिल (३९. २४), १६ एप्रिल (३९.२४), १७ एप्रिल (४०.२६) अंश तपमानाची नोंद झाली आहे. बुधवारी (दि.१७) एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तपमानाचा पारा ४१.२८ अंश सेल्सियसची नोंद झाली.
पहिल्यांदा एवढ्या मोठ्या तापमानाची नोंद झाली आहे. हा आतापर्यंतच्या मोसमातील शहरातील सर्वात उष्ण दिवस होता. जुने जाणकार वयोवृद्ध नव्वदी गाठलेली मंडळी सांगतात की, आमच्या आयुष्यात आम्ही पहिल्यांदाच एव्हढ्या जास्त प्रमाणात तपमानाचा अनुभव घेतला आहे. १२ महिने बागायती भाग म्हणून ओळख असलेला कोपरगाव तालुक्यात उष्णतेचा पारा प्रचंड वाढला आहे.
या तपमानामुळे उष्माघाताचा फैलाव होवुन त्यातून दगाफटका होवू शकतो. पुन्हा एकदा आपल्याला कोपरगाव कॅलिफोर्निया करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षरोपण करावी लागणार आहे. त्याचबरोबर झाडांची कत्तल याला आळा घालावा लागणार आहे, यासाठी सरकारी अधिकारी यांनी चोख कर्तव्य बजावण्याची गरज असल्याचे निसर्गप्रेमी यांचे म्हणणे आहे.
मुक्या जनावरांना फटका
वाढत्या तपमानाचा फटका मुक्या जनावरांना व पशु-पक्षांना जास्त बसत आहे. प्रत्येकाने सामाजिक कर्तव्य म्हणून गाय, बैल, शेळ्या-मेंढ्या इतर प्राणी तसेच विविध प्रकारचे पक्ष्यांना आपापल्या घरासमोर,
तसेच छतावर पाणी ठेवून पाणी पाजण्याची पुण्य करावे, तसेच कोकमठाण येथील गोशाळेत हिरवा चारा दान करावा, असे आवाहन निसर्गप्रेमी नागरिकांकडून करण्यात आले आहे.
वाढत्या उन्हात प्रत्येकाने काळजी घ्यावी, महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे. उन्हापासून संरक्षण होण्यांसाठी आवश्यक चष्म्यांचा, टोप्यांचा, छत्रीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे, कांदा जवळ बाळगावा. घरात लहान बाळ, चिमुकली मुले-मुली असतील तर त्यांची प्रत्येक माता-पित्यांने काळजी घ्यावी.
दिवसभरात त्यांना पिण्यांचे पाणी भरपूर द्यावे. वयाने मोठ्या असलेल्या नागरिकांनी व वयोवृध्द रूग्णांनी सुध्दा स्वतःला जपावे. थंडपेयापेक्षा कैरीचे, चिंचेचे पन्ह, लिंबु सरबत, उसाचा रस, ताक यांचा समावेश आहारामध्ये वाढवावा. रूग्णांनी वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने आहार संतुलन ठेवावे. – डॉ. कृष्णा फलसौंदर, तालका वैद्यकीय अधिकारी