अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील आमराईमळ्यात काही तरुणांना संध्याकाळच्या वेळी बिबटया निदर्शनास आला. विशेष म्हणज़े.
बिबटया दिसण्यापूर्वी पाच मिनिटे अगोदर माय-लेकी या ठिकाणावरून पुढे निघून गेल्याने त्या बचावल्या व मोठा अनर्थ टळला. बिबट्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
दि.१६ रोजी संध्याकाळी सहा वाजता संजय दत्तू कौठाळे यांच्या शेतात अरुण दादाभाऊ कौठाळे हे ट्रॅक्टरने मका पेरणी करत होते.
शेजारील वसंत कौठाळे यांच्या शेतात वसंत यांची पत्नी अनिता व लहान मुलगी प्रज्ञा कडवळ कापून नुकत्याच घरी गेल्या होत्या. काही वेळातच अनिता यांनी कापलेल्या कडवळाच्या पेंढीवर बिबटया उभा असलेला अरुण कौठाळे यांनी पाहिला.
थोडया वेळाच्या अंतराने या मायलेकीवरील संकट टळले होते. त्यानंतर अरुण कौठाळे, संजय कौठाळे, प्रकाश कौठाळे ,रवींद्र कौठाळे यांनी ट्रॅक्टर बिबटयाच्या दिशेने वळवला.
त्यानंतर बिबट्याने तेथून दुसऱ्या शेतात धूम ठोकली. त्यानंतर दि.१७ रोजी संध्याकाळी त्याच ठिकाणी सतीश कौठाळे व अक्षय कौठाळे यांनादेखील तोच बिबट्या निदर्शनास आला.
या बिबटयाने याच परिसरात विश्वास कोकाटे यांच्या शेळयांची दोन करडं फस्त केले आहेत. यापूर्वी वाघमारे वस्ती परिसरात दीपक कौठाळे तसेच ग्रामस्थांनी बिबटयाला पाहिले होते.