Ahmednagar News : ज्याप्रमाणे शासन शेतकऱ्यांच्या उडीद, तूर, कापूस, सोयाबीन, ज्वारी, भुईमूग, सूर्यफूल, मूग, मका, नाचणी आदी शेतीमालाला जसा हमीभाव देत आहे. त्या प्रमाणे दुधालाही हमीभाव मिळाला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे. ती देणे ही सध्या काळाची गरजेच झाली आहे.
आज शेतीला जोडधंदा म्हणून निवडलेल्या या धंद्यातून अनेक तरुण बाहेर पडण्याचा मार्गावर आहेत. तसे झाले तर मोठ्या प्रमाणावर कृत्रिम दूध मार्केटमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने वेळीच याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी दर १० दिवसाला मिळणारा पैसा आता फक्त पाहण्यासाठी राहिला आहे. कारण आलेल्या दुधाच्या पैशातून एक रुपयाही शिल्लक राहत नाही. दुधाचे दर कमी व खर्च जास्त होत आहे. त्यात अनेकदा ही जनावरे आजारी पडतात त्यामुळे तो देखील मोठा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो.
मात्र दुसरीकडे पशुखाद्याचे दर मात्र कधीच कमी होत नाहीत ते वाढत जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना आता हा व्यवसाय परवडत नाही. परिणामी अनेकजण यातुन बाहेर पडत आहेत.
एकीकडे वाढत असलेली महागाई तर दुसरीकडे दुधास मिळत असलेले भाव पाहता दूधउत्पादक मेटाकुटीस आला असून एक लाख रुपयांना खरेदी केलेली गाय आता ते ६० हजार रुपयांना विकत आहे.
सध्या गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाला चांगला भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी काही गाय विकून म्हैस खरेदी करू लागले आहेत. म्हशीच्या दुधाला ८० रुपया पर्यंत भाव मिळत आहे. मात्र यात देखील फारसे परवड आहे असे नाही त्यामुळे याबाबत वेळीच निर्णय घेणे गरजेचे आहे.
अनेकांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दूध धंद्यास पसंती दिली व कोरोना नंतर अनेक सुशिक्षित बेरोजगार सुद्धा या व्यवसायात उतरले आहेत; परंतु या दुधाच्या व्यवसायात काहीच नफा शिल्लक रहात नसल्याने दुधाचा व्यवसाय नको रे बाबा अशी अवस्था त्यांची झाली आहे.