अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2022 :- किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावरून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्यापासून म्हणजेच १४ फेब्रुवारीपासून उपोषणाचा इशारा दिला आहे.
मात्र आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाव न घेता हजारे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. नाटेगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी राज्य सरकारने घेतलेल्या वाईन विक्रीच्या निर्णयाचे समर्थन करताना भुजबळ यांनी आण्णा हजारे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. मंत्री भुजबळ म्हणाले की, आपल्याकडे आंदोलनाला तोटा नाही.
आता समाजसेवक पण याबाबतीत जागे झाले. वाईनविरोधात उपोषण करणार, आंदोलन करणार असं म्हणतात. ७ वर्षात या देशात काय सुरू आहे.
लाखो शेतकरी दिल्लीच्या दरवाजावर बसले, ७५० शेतकरी मृत्युमुखी पडले, मात्र यावेळी कोणी उपोषण केलं नाही. नोटाबंदी व जीएसटीमुळे ४ कोटी लोक बेरोजगार झाले.
हे काही दिसलं नाही आणि वाईनच्या बाबतीत ताबडतोब उपोषणाला बसणार आहेत. वाईन ठेवायला कोणी जबरदस्ती केली नाही, आम्ही फक्त परवानगी देणार आहोत, असं भुजबळ म्हणाले.
दरम्यान इतर राज्यातील मद्यविक्रीच्या मुद्द्यावरून मंत्री भुजबळ म्हणाले, कर्नाटकात ७ तर मध्यप्रदेशमध्ये ५ दुकाने आहेत. मध्य प्रदेशमध्ये जर इन्कम एक कोटी असेल तर घरातच परमिट रूम सुरू करण्यासाठी परवानगी आहे.
मग हा मध्यप्रदेश की मद्यप्रदेश? विरोधकांचे तिकडे लक्ष जात नाही, फक्त महाराष्ट्रतच जाते. अशा शब्दात मंत्री भुजबळ यांनी अण्णांचे नाव न घेता त्यांच्या उपोषणाच्या मुद्द्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. दरम्यान आता या प्रकरणी अण्णा काय निर्णय घेतात याकडे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.