अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- नेवासा शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी एकूण 34 कोटी 15 लाख रुपयाला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.
नामदार शंकरराव गडाख यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष प्रयत्न करून हा निधी मंजूर केला आहे. यामुळे शहराचा पाणी प्रश्न मिटणार आहे.
हे काम पूर्ण करण्यासाठी अठरा महिन्याचा कालावधी देण्यात आला असून प्रकल्प खर्चाच्या 10 टक्के रक्कम नेवासा नगरपंचायतीने स्वनिधीतून भरावयाची अट मान्यतेत घालण्यात आलेली आहे.
राज्यातील नागरी भागात मुलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढविण्याकरिता राज्य शासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अंतर्गत हि योजना राबवण्यात आली आहे.
दरम्यान नेवासा शहरात जुन्या योजनेद्वारे होणारा पाणीपुरवठा अशुद्ध व कमीस होता. यामुळे नवीन शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा करणारा प्रकल्प उभारावा अशी बर्याच दिवसांपासूनची नागरिकांची मागणी होती.
या सर्व बाबींचा विचार करून नवीन 7 एम एल डी क्षमतेच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पातून प्रति माणसी 135 लिटर प्रतिदिन पाणी मिळणार आहे.
याप्रमाणे नवीन योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने व येत्या दीड-दोन वर्षात पाईपलाईनचा प्रश्न मार्गी लागत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.