अहमदनगर बातम्या

आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरचा सहकार देशासाठी मॉडेल बनवला

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : संगमनेर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ साध्या पद्धतीने काल गुरूवारी करण्यात आला. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार बाळासाहेब थोरात यांनी सर्व कार्यक्रम रद्द केल्याने ते या कार्यक्रमाला अनुपस्थित होते.

यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आणि कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बाजीराव खेमनर, इंद्रजीत थोरात, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, व्हा. चेअरमन संतोष हासे,

संचालक गणपतराव सांगळे, चंद्रकांत कडलग, अभिजीत ढोले, रोहिदास पवार, माणिक यादव, अनिल काळे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, रमेश गुंजाळ, विनोद हासे, संभाजीराव वाकचौरे, मंदाताई वाघ, मीराताई वरपे, सुरेश झावरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

यावेळी कृषी शैक्षणिक सहकार क्रांतीचा जागर असणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त स्टिकरचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. तांबे म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी कायम तत्त्वाचे राजकारण केले. त्यांनी कधीही तत्त्वाची तडजोड केली नाही.

अमृत परिवारासाठी राजहंस हा ब्रँड त्यांनी दिला आहे. कॉंग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत तन्मयतेने आणि शिस्तीने ही आदर्श व तत्वे जपत सहकाराला आधुनिकतेची जोड देऊन संगमनेरचा सहकार देशासाठी मॉडेल बनवला आहे. उत्तम काम येथे होत असून हा कारखाना सहकारातील इतर कारखान्यांसाठी मापदंड ठरला आहे.

यावेळी बाबासाहेब ओहोळ म्हणाले की, प्रत्येक हंगाम हा आव्हानात्मक असून यावर्षी कमी पाऊस आणि कमी उसामुळे कारखानदारीमध्ये अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे.

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे या कारखान्यावर सभासद ऊस उत्पादक, कार्यक्षेत्र बाहेरील उत्पादक या सर्वांचा मोठा विश्वास असून कारखान्याने कायम उच्चांकी भाव देताना सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी काम केले असल्याचे ते म्हणाले.

प्रारंभी कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविक केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. तर व्हा. चेअरमन संतोष हासे यांनी आभार मानले.

Ahmednagarlive24 Office