राजकारण करताना विरोधकांनी तालुक्याच्या हिताला प्राधान्य देऊन विकासकामांना खोडा घालण्याचा उद्योग थांबवावे, असे आवाहन आमदार शंकरराव गडाख यांनी केले. नेवासे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपआवारातील १६ कोटी रुपये खर्चाच्या काँक्रीटीकरणचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पांडुरंग अभंग होते. प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांनी केले. सचिव देवदत पालवे यांनी स्वागत केले.
आमदार गडाख यांनी बाजार समितीच्या कारभाराचा आढावा घेऊन एकेकाळी कर्मचाऱ्यांचे पगार करण्यास असमर्थ असलेली बाजार समितीची आज राज्यातील अग्रगण्य बाजार समित्यांमध्ये गणना होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
संचालक मंडळ, कर्मचारी, हमाल, मापाडी, सफाई कामगार यांची मेहनत तसेच घोडेगाव ग्रामस्थांसह व्यापारी, शेतकऱ्यांनी सकारात्मक साथ दिल्यामुळेच बाजार समितीची प्रगती झाल्याची कृतज्ञातही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
घोडेगाव उपआवारातील जनावरांचा बाजार, कांदा मार्केटमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत असल्याने राजकीय विरोधकांनी जबाबदारीने वागण्याची अपेक्षात्यांनी व्यक्त केली.
विरोधकांनी राज्यातील सत्ता बदलाच्या समिकरणाचा गैरफायदा घेऊन तालुक्यातील विकासकामांना खोडा घालण्याचे काम केल्याची खंत आमदार गडाख यांनी व्यक्त केली. विरोधकांनी आपल्या नेतृत्वाखाली कार्यरत मुळा कारखाना, मुळा एज्युकेशन, दूध संघ, नेवासे बाजार समिती, शनैश्वर देवस्थान, मुळा बैंक आदी संस्थांवर बेछूट आरोप करून सत्तेचा गैरवापर करत नाहक चौकशा लावल्याचे त्यांनी लक्ष वेधले.
मात्र, सर्वच संस्थांचा कारभार चोख आढळल्याने निमूटपणे क्लीन चीट देण्याची नामुष्की शासकीय यंत्रणावर ओढवल्याची बाब त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली. विरोधकांच्या खोडा घालण्याच्या प्रवृत्तीमुळे मोठी संधी मिळूनही तालुक्याचा अपेक्षित विकास साधता न आल्याची खंत आमदार गडाख यांनी यावेळी व्यक्त केली.
घोडेगावच्या कांदा मार्केटला राज्यात अग्रेसर कांदा मार्केट बनवणार असल्याचे आमदार गडाख म्हणाले. याप्रसंगी माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी नेवासे बाजार समितीच्या पथदर्शी कारभाराचे कौतूक केले. यावेळी सुदामराव तागड, अशोकराव येळवंडे, डॉ. अशोक ढगे, जगन्नाथ कोरडे, माजी सभापती कारभारी जावळे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी विश्वासराव गडाख, काशीनाथ नवले, दत्तात्रय काळे, अजित मुरकुटे, डॉ. शिवाजी शिंदे, तुकाराम शेंडे, सुरेश गडाख, बाप्पूसाहेब शेटे, सभापती श्र रावसाहेब कांगुणे, अशोक मंडलिक, बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, उपसभापती नानभाऊ नवथर आदी उपस्थित होते. आभार अण्णासाहेब पटारे यांनी मानले. आमदार गडाख यांनी हमाल तसेच महिला सफाई कामगारांचा सत्कार केला.
वाढपी आपला हवा : अभंग
एफआरपीसाठी आग्रह धरणारे शासन दुसरीकडे एमएसपीवर निर्णय घेत नसल्याच्या धोरणामुळे कारखानदारी धोक्यात आली. मुळा कारखान्याला द्वेषातून मदत मिळाली नसल्याने शासकीय वाढप्या आपला पाहिजे, असे सूचक विधान माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी केले. आमदार गडाख यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात शांतता आहे, मात्र तरीही सावधगिरी बाळगून कामाला लागण्याचे आवाहन केले.