आमदार लंकेनी केली विस्थापितांचे राज्यातील आदर्श नगर उभारण्याची घोषणा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- संपूर्ण राज्यातील ग्रामिण भागाची प्रगती होत असताना तालुक्यातील हनुमाननगरची मात्र अधोगती झालेली पाहून मनाला वेदना होत असल्याचे सांगतानाच विस्थापितांचे राज्यातील आदर्श हनुमाननगर उभारण्याची घोषणा आमदार नीलेश लंके यांनी शनिवारी केली. मुळा धरणामुळे विस्थापित झालेल्यांची हनुमानगर ही पुनर्वसन वसाहत आहे.

विविध विकास कामांच्या निमित्ताने पंधरा दिवसांपूर्वी वनकुटे येथे सरपंच राहुल झावरे यांच्या निवासस्थानी मुक्कामी असलेल्या आमदार नीलेश लंके यांची भेट घेऊन हनुमाननगरच्या नागरिकांनी गेल्या पन्नास वर्षांपासून ते सहन करीत असलेल्या वेदनांचे गाऱ्हाणे मांडले. त्याच वेळी तुमच्या मनातील ही खंत मी निश्चित दूर करील, अशी ग्वाही आमदार लंके यांनी दिली होती.

हनुमाननगरच्या विविध समस्यांबाबत जिल्हा पुनर्वसन उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तसेच मंत्रालयातील विविध अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आमदार लंके यांनी हनुमाननगरचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्धार केला. पंधराच दिवसांत हनुमाननगरवासियांची भेट घेत आदर्श नगर उभे करून त्यांच्या मनातील गेल्या पन्नास वर्षांपासूनची निर्माण झालेली परकेपणाची भावना दूर केली. यावेळी आमदार लंके म्हणाले, पन्नास वर्षांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी १० एकर जमीन बिनशेती करून हनुमाननगर वसवले गेले.

त्यानंतर तब्बल पन्नास वर्षांत तेथील मुलभूत सुविधांकडे लक्ष दिले गेले नाही, हे दुर्देव आहे. मुळा धरणाच्या माध्यमातून इतरांना समृद्ध करण्यासाठी स्वतःच्या जमीनींचे बलीदान देणाऱ्या बळीराजाच्या नशिबी गेल्या पन्नास वर्षांत आलेले दुःख, वेदना आता मी दूर करणार आहे. येथील महिलांना बाराही महिने पाण्यासाठी दररोज भटकंती करावी लागते. त्यांचा अर्धा दिवस त्यातच जातो, याची कल्पना आमदार लंके यांना यापूर्वीच्या भेटीत देण्यात आली होती. त्यामुळे हनुमाननगरसाठी स्वंतत्र विहीर तसेच पाइपलाइनसाठी प्रत्येकी दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले.

त्याचे भूमिपूजन करून आमदार लंके यांनी हनुमाननगरच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. अखंड वीजपुरवठा, प्रत्येेकाला स्वतंत्र शौचालय, रस्ते, पथदिवे, सभामंडप, डिजिटल शाळा या कामांना लवकरच प्रारंभ करण्यात येईल. विविध योजना राबवून राज्यात आदर्श नगर उभे करण्याचा मानस यावेळी आमदार लंके यांनी व्यक्त केला. तास येथील वनजमीन, त्यावरील अतिक्रमण, भुलदरा येथील शाळा हे प्रश्‍न देखील येत्या काही दिवसांत मार्गी लागलेले असतील. सन १९६९ पासून भिजत पडलेल्या के. के. रेेंजचा प्रश्‍न मार्गी लावण्यात आपणास काही अंशी यश आले.

शासनाने सुरू केलेली जमीन अधिग्रहणाची प्रकिया खासदार शरद पवार यांच्या माध्यमातून कायमची थांबवण्यात आली. आता ‘रेड झोन’चा प्रश्‍न मार्गी लावल्यानंतर या भागातील शेतकरी, कष्टकरी तसेच आदीवासी सुखा समाधानाने नांदतील, असा विश्‍वास अामदार लंके यांनी व्यक्त केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24