रविवारी (दि.२६) अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. ९ मंडळात मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. परंतु सर्वात जास्त फटका पारनेर तालुक्यात बसला. कुठे फळबागा उध्वस्त झाल्या तर कुठे पिके भुईसपाट झाली. पोल्ट्री फार्ममधील हजारो कोंबड्या मेल्या.
आ. निलेश लंके अस्वस्थ
या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची तालुक्यातून रात्री उशिरापर्यंत माहिती येत होती. ते रात्रभर नुकसान झालेल्या भागातून माहिती घेत विचारपूस करत होते. रविवारी सायंकाळीच आमदार लंके यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती देत नुकसानभरपाईची मागणी देखील केली होती.
लंके हे रात्रभर अस्वस्थ दिसत होते. पहाट होताच त्यांनी साडेपाचलाच थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. पारनेरवर दुष्काळाचे सावट असताना दुष्काळी तालुक्यांच्या यादीत पारनेरचा समावेश व्हावा,
यासाठी त्यांनीच प्रथम पाठपुरावा केला होता. आता गारपिटीने झालेल्या नुकसानीमुळे त्यांनी सकाळी साडेपाच वाजता घर सोडून बाहेर पडत शेतकऱ्यांना धीर दिला
मुख्यमंत्र्यांशी काय झाले बोलणे ?
रविवारी रात्रीच आ. लंके यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती दिली होती. यात त्यांनी पारनेर, पानोली, सांगवी सुर्या, जवळे, निघोज, करंदी, वडझिरे, चिंचोली, हंगा, वडनेर हवेली, राळेगणथेरपाळ, पिंपळनेर, गुणोरे, गांजीभोयरे, जातेगांव, म्हसणे सुलतानपुर, गटेवाडी, पठारवाडी, लोणीमावळा या गावांमध्ये मोठं नुकसान गारपिटीने केले आहे अशी माहिती दिली.
तसेच या भागात जुन-जुलै व ऑगस्टमध्ये पाऊस नसल्याने पहिले पीक वाया गेले होते असे सांगितले. व आता हातातोंडाशी आलेले दुसरे पीक अवकाळी गारपीटीमुळे वाया गेले. या भागांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्या असे मागणी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली.
केली पाहणी
वादळी वार्यासह गारपीट होऊन झालेल्या नुकसानीची आमदार नीलेश लंके, माजी आमदार विजय औटी, भाजप तालुकाध्यक्ष राहूल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर यांनी रविवारी सायंकाळी पाहणी केली. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकर्यांनी केली.