आमदार निलेश लंके यांचा खासदार सुजय विखेंवर पलटवार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- करोना रोखण्यासाठी मी जिल्ह्यात फिरत आहे. गुन्हा दाखल करायचा असेल तर माझ्या एकट्यावरच नव्हे तर आरोग्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांवर देखील गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी खासदार सुजय विखे यांनी केली होती.

यावरून आमदार निलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर पलटवार केला आहे. ‘मी काम करणारा माणूस आहे व काम करणाऱ्या माणसाने इकडे तिकडे लक्ष द्यायचे नसते. त्यामुळे कोण काय बोलते याला काही महत्व देण्याचे कारण नाही. मी त्याकडे लक्षही देत नाही.

आता आरोग्यमंत्र्यांनी काय केले, स्थानिक आमदारांनी काय केले, असे बोलणे हा रडीचा डाव आहे,’ असा पलटवार आमदार निलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर केला आहे. विखे यांनी के.के.रेंज प्रश्नावर नगर, पारनेर, राहुरी तालुक्यातील गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत.

या बैठकीमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळले गेले नसल्याचे समोर आले आहे. या बैठकीचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर विखे यांच्यावर टीका सुरू झाली होती. मात्र या टीकेला उत्तर देताना विखे यांनी आरोग्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांवर देखील गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आज केली आहे.

मात्र, यावर तातडीने लंके यांची प्रतिक्रिया आली आहे. लंके जिल्हाधिकारी कार्यालयात आज आले असता बोलत होते. ‘कोविड सेंटर उदघाटन कार्यक्रमाला आम्ही सोशल डिस्टंसिंग पाळले की नाही, हे त्यांना माहिती नाही. आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळत कार्यक्रम केला.

राज्याचे आरोग्य मंत्री त्या ठिकाणी येतात, याचे आम्हाला भान होते. या कार्यक्रमात शंभर टक्के सोशल डिस्टंसिंग पाळले गेले आहे . त्यामुळे कोणाच्या बोलण्याला काय महत्त्व द्यायचे, हे बाकीच्यांनी ठरवायचे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘कार्यक्रमाच्या ठिकाणी आरोग्य विभागाचे कर्मचारी होते.

वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी होते. या सर्वांना ही माहिती आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळत कार्यक्रम झालाय. काम करीत असताना सरकारने ठरवून दिलेले नियम व अटींचे पालन आपण आपल्या पद्धतीने करायचे. कोण काय बोलते, याला काही महत्त्व देण्यात अर्थ नाही.

काम करणार्‍या माणसांनी इकडे तिकडे लक्ष द्यायचे नसते. त्यामुळे मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. आरोग्यमंत्र्यांनी काय केले, स्थानिक आमदारांनी काय केले, असे बोलणे हा तर रडीचा डाव आहे,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24