MLA Rohit Pawar : सिना नदीवरील अत्यंत महत्त्वाचे असणारे कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे १९९८ च्या काळात पूर्ण झालेले आहेत. या बंधाऱ्यांना लोखंडी फळ्या बसविण्यात आलेल्या असून त्यांच्या दरवाजांची पद्धतही कालबाह्य झाल्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होऊन पाण्याचा अपव्यव्य होत होता.
हीच गोष्ट ओळखून सदरील बंधाऱ्यांचे रूपांतर लातूर टाईप बॅरेजमध्ये झाल्यास बंधाऱ्यामध्ये चांगल्या प्रकारे पाणी अडवता येईल आणि ऑटोमॅटिक लिफ्टिंग गेटमध्ये रूपांतर केल्यास त्यामध्ये सप्टेंबरपासूनच पाणी अडवता येईल आणि याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल ही गोष्ट आमदार रोहित पवार यांनी ओळखून शासनाच्या लक्षात आणून देत याबाबत मागणी केली होती.
त्यानुसार एकूण १० बंधाऱ्यापैकी यापूर्वीच ६ बंधाऱ्यांच्या कामांना परवानगी मिळाली होती. आणि आता उर्वरित ४ बंधाऱ्यांचे काम करण्याला देखील प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
आमदार रोहित पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला आणि प्रयत्नांना अखेर यश आले असून सिना नदीवर असणाऱ्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांना लातूर टाईप बॅरेजमध्ये रूपांतरित करण्याच्या एकूण २५.४४ लाख रुपयांच्या सर्वेक्षणाच्या कामाला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
आमदार पवार यांनी याबाबत वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा करून महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून सर्व्हेसाठी परवानगी मिळवली होती.
आणि सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर पूर्वी सहा बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली होती आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस या दोघांना भेटून उर्वरित चार बंधाऱ्यांनाही मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार पवार यांनी केली होती.
त्यानुसारच आता उर्वरित चार बंधारे म्हणजेच निमगाव गांगर्डा, निमगाव डाकू, चौंडी व दिघी या बंधाऱ्यांचे लातूर टाईप बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या कामासही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे सिना लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. यापूर्वी रातंजन, घुमरी, नागलवाडी, नागापुर, सीतपुर व तरडगाव या कोल्हापुरी टाईप बंधाऱ्यांचे रूपांतर लातूर टाईपमध्ये करण्याच्या कामाला मान्यता मिळाली होती.
सिना नदीवर होणाऱ्या लातूर टाईप बॅरेजचा मतदारसंघातील शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल आणि सिंचन क्षेत्र अबाधित राहील असा विश्वास आहे. आणि हजारो हेक्टर जमिनीला याचा फायदा होणार आहे. – आ. रोहित पवार.