Ahmednagar News : मराठवाड्याला खाली पाणी सोडायची वेळ आली तर निळवंडेचे सोडा, परंतु मुळा व भंडारदरा धरणांचे पाणी सोडण्याला आमचा प्रखर विरोध राहील. वेळ पडल्यास शेतकऱ्यासह रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल, असा इशारा माजी मंत्री व आमदार शंकरराव गडाख यांनी दिला आहे.
जायकवाडीत पाणी असताना मुळा व भंडारदराचे पाणी मराठवाड्याला सोडण्याचा हालचाली चालू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर गडाख यांचे वरील वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे. मुळा सहकारी साखर कारखान्याच्या 46 व्या गळीत हंगाम बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ प्रसंगी आ. शंकरराव गडाख बोलत होते.
माजी खा. यशवंतराव गडाख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी मुळाचे चेअरमन नानासाहेब तुवर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी माजी सभापती कारभारी जावळे, अशोकराव गायकवाड, अॅड. बापूसाहेब गायके आदींनी मनोगत व्यक्त केले.
मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसतांना ‘समन्यायी’ च्या नावाखाली मराठवाड्याला पाणी सोडणे अयोग्य असून प्रामुख्याने नेवासा तालुक्यासाठी अन्यायकारक असल्याचे मत आ. गडाख यांनी व्यक्त केले आहे.
मुळाचे पाणी राजकीय दबावाखाली जर जायकवाडीला सोडण्यास आले तर नेवासा तालुक्याला याचा मोठा फटका बसणार आहे. जायकवाडीत पुरेसा पाणी साठा शिल्लक असतांना राजकीय दबावाखाली मुळाचे पाणी जायकवाडीला सोडण्याचा घाट घातला जातो आहे.
जर मुळा धरणातून खाली पाणी सोडण्याचा निर्णय झाला तर लाभधारक शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारण्याचा गर्भित इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, मुळा व भंडारदरा धरणाच्या पाण्यासाठी शंकरराव गडाख हे गेल्या अनेक वर्षांपासून भांडत आहेत. नेवासा तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी गडाख यांनी रस्ता रोको तसेच विविध आंदोलने केली आहे.
तसेच पाण्यासाठी त्यांच्यावर अनेक केसेस दाखल असून त्यांना यासाठी जेलमध्ये सुद्धा जावे लागले आहे. धरणाच्या पाण्यासाठी लढणारा नेता, अशी ओळख गडाख यांची झाल्याची चर्चा उपस्थिता मध्ये होती.