शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील हार्डवेअर दुकान चालक दत्तात्रय दामोदर वैद्य यांच्या पँटच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलने अचानक पेट घेतल्याने अंगावरील पॅट जळून मांडीला व हाताला भाजल्याने किरकोळ इजा होऊन ते जखमी झाले आहेत.
सदर घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, बालमटाकळी येथील हार्डवेअर दुकान चालक दत्तात्रय दामोदर वैद्य हे सोमवार (दि. १८) रोजी सकाळी दुकानात बसले होते, या वेळी अचानक दुकानात त्यांना सर्वत्र धूर दिसू लागला,
त्यामुळे त्यांनी इकडे तिकडे पाहताच त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या पॅन्टच्या खिशातून धूर निघत असून, पॅन्टचा खिसादेखील गरम होत असल्याचे जाणवले, त्यांनी ताबडतोब खिशातील मोबाईल बाहेर काढला, तोपर्यंत त्यांच्या पॅन्टने पेट घेतला होता,
खिशातील मोबाइल हातात घेतल्यानंतर हँडसेटने लगेच पेट घेतला, त्यांनी मोबाईल खाली फेकून देताच तो जळून खाक झाला, या वेळी त्यांच्या हाताला व मांडीला भाजले, अशी माहिती दत्तात्रय वैद्य यांनी दिली.
दत्तात्रय वैद्य यांनी पाच वर्षापूर्वी एम.आय. कंपनीचा रेडमी सेवन हा मोबाईल खेरदी केला होता. मोबाईल जळत असल्याचे लगेच त्यांच्या लक्षात आल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, कशामुळे मोबाईलचा स्फोट झाला हे अजून समजले नाही. वैद्य यांनी सतर्कता दाखवत मोबाइल दूर फेकला मात्र, तरीसुद्धा या घटनेत ते जखमी झाले. त्यामुळे मोबाईल हाताळणे किती धोकादायक असू शकते, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.