अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदा प्रतिनिधी दि.२४: मढेवडगाव ता. श्रीगोंदा येथे पाणंद रस्ता स्थळ पाहणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी दि.२४ रोजी पोलिस बंदोबस्तात आले होते
मात्र सरपंच महानंदा मांडे यांनी ग्रामविकास अधिकारी मनोज गुरव यांना हजर राहण्याची सूचना देऊनही ग्रामविकास अधिकारी गुरव कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे स्वतःबरोबर नेऊन गायब झाले.
हा प्रकार पाहून सरपंच महानंदा मांडे यांनी गटविकास अधिकारी गोरख शेलार यांच्याकडे तक्रार करून ग्रामपंचायतच्या कार्यालयालाच सीलबंद करून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की गावठाण शेजारील अतिक्रमित पाणंद रस्त्याच्या स्थळ पाहणीसाठी श्रीगोंदा भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी शुक्रवारी आले होते.
संवेदनशील रस्ता असल्याने ग्रामपंचायतने पोलिस बंदोबस्त मागवला होता. परंतु अचानक ग्रामविकास अधिकारी गैरहजर राहिल्याने सरपंच व लिपिक शुभम वाबळे यांनी तपासणी केली असता
ग्रामविकास अधिकारी गुरव यांनी स्वतःबरोबर रस्तासंबधी फाईल, सरपंच शिक्के, ग्रामनिधी, पाणीपुरवठा, रोकडवही, चेकबुक, गट नं.४४५ व ४४६ ची पाणंद रस्ता मोजणी फाईल घरी घेऊन गेल्याचे आढळले.
सरपंच महानंदा मांडे व सदस्य यांनी गुरव यांना फोन केला असता आधी त्यांनी वडिलांचे वर्षश्रद्ध सांगितले नंतर पलटी मारून पित्र कार्यक्रम असल्याचे सांगितले.
सरपंचांनी रजेचा अर्ज नसल्याचे सांगितल्यावर गुरव यांनी शुक्रवारी सकाळी रजेचा अर्ज पंचायत समितीच्या टपालात दिल्याचे समजले. या प्रकारामुळे सरपंच महानंदा मांडे, उपसरपंच दीपक गाडे, गणेश मांडे, काळूराम ससाणे,
कल्याणी गाढवे, राणी मांडे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करून ग्रामपंचायत कार्यालयातील कपाट व कार्यालयपंचनामा करून सील केले आहे.
अतिक्रमित रस्ता एका राजकीय नेत्याशी संबंधित असल्याने राजकीय दबावापोटी ग्रामविकास अधिकारी गैरहजर असल्याची चर्चा गावात सुरू आहे.
या प्रकाराची स्वतः गटविकास अधिकारी गोरख शेलार यांनी मढेवडगावला येऊन माहिती घेतली. #चौकट- याबाबत ग्रामविकास अधिकारी मनोज गुरव यांच्याशी संपर्क साधला असता
त्यांनी अरेरावीची भाषा वापरली व मला विचारणारे तुम्ही कोण? परत मला असा फोन करायचा नाही अशी दमदाटी केली. तुम्हाला कुठे तक्रार करायची आहे तिथे करा असे उद्धट भाषेत उत्तर दिले.