Big Breaking : मोहटादेवीच्या यात्रा काळात डिजे वाजविण्यावर बंदी, मुख्य मंदीरातील गाभाऱ्यातील व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. यात्रा काळात पाथर्डी शहरातील गर्दी व वाहतुक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहटा परीसरात दारुबंदी करण्यात येणार असल्याची माहीती जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिली.
यावेळी बोलताना सालीमठ म्हणाले, नवरात्र कालावधीत येणाऱ्या भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी देवस्थान समिती व यात्रा समिती काम करील. गाभारा दर्शन बंद करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. व्हीआयपीच्या नावाने कुणीही गाभाऱ्यातील दर्शनाचा आग्रह धरु नये. सर्व विभागाच्या प्रमुखांनी नवरात्र काळात देवीगडावर लक्ष ठेवुन रहावे.
वाहतुक व्यवस्था, आरोग्याच्या सुविधा, पिण्याचे पाणी, गर्दीवर नियंत्रण अशा कामासाठी सामुहिक काम करावे लागेल. राष्ट्रीय महामार्गावरील तनपुरवाडी ते आटीआयपर्यंतचा रस्ता दुरुस्तीसाठी निधीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याशी बोलणार असल्याचे सालीमठ म्हणाले.
यावेळी बोलताना राकेश ओला म्हणाले, पाथर्डी शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणे व हातगाडे यांच्याविरुद्ध बांधकाम विभाग, पालिका, महसुलचे अधिकारी व पाथर्डीचे ठाणेदार संतोष मुटकुळे यांनी कडक कारवाई करावी.
दंडात्मक व न्यायालयीन कारवाई देखील करावी. वाहनतळाची व्यवस्था करुन नियोजन करावे. गर्दीवरील नियत्रणांसाठी पोलिस बंदोबस्त दिला जाईल. वाहने मुख्य कमानीजवळच अडवली जावीत.
भाविकांना पायी चालण्याचा आनंद घेता येईल व भक्ती प्रकट करता येईल. मोठी ट्रॅव्हल्ससारखी वाहने दुरच उभी करावीत. त्यानंतर छोटी चारचाकी वाहने व नंतर दुचाकीसाठीचे वाहनतळे तयार करावीत. नियोजनात सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भनगे यांनी प्रस्ताविक केले. डॉ. श्रीधर देशमुख यांनी आभार मानले.
मोहटादेवीच्या गाभाऱ्यातील नवरात्र काळातील दर्शन बंदीचा विश्वस्त समिती व सर्वच विभागाचे प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये झालेला निर्णय अतिशय चांगला आहे. देवीच्यासमोर सर्वजण सारखेच आहेत हा एकतेचा संदेश देणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचा पत्रकारांच्या वतीने गौरव करण्यात आला.
जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांचा सत्कार पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा न्यायाधीश सुनिल गोसावी यांचा सत्कार अविनाश मंत्री यांनी केला. पोलिस अधिक्षक राकेश ओला यांचा सत्कार अॅड. हरीहर गर्जे यांनी केला. यावेळी सर्व पत्रकार उपस्थित होते.