Ahmednagar News : गेल्या ८ दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील उभी पिके पाण्याखाली गेल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
नगर तालुक्यातील कामरगाव येथे संतत धार पाऊस झाल्याने मूग, बाजरी, तूर, सोयाबिन, कांदा, शेवंती, झेंडू आदि पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. चास मंडळांतर्गत ६५ मिमी. पावसाची नोंद असून, तहसील कार्यालयाकडून कृषी विभागाला नुकसान भरपाई पंचनामे करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले नाही. शासनाच्या केवळ वेळकाढू धोरणामुळे बळीराजा नुकसान भरपाई पासून वंचित राहण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
सोंगणीला आलेला मूग, सडलेले सोयाबिन, भूईसपाट झालेली बाजरी, करपलेला झेंडू उभाळलेली शेवंती असे विदारक चित्र गावात निर्माण झाले असून, शेतकरी धर्मसंकटात सापडला आहे.
गावातील एकूण १०० हेक्टर शेतजमिनीचे पंचनामे तातडीने करावेत, अशी मागणी मा.सरपंच वसंतराव ठोकळ, सरपंच तुकाराम कातोरे, प्रकाश कातोरे, शरद दळवी, राजकुमार दळवी, रमेश पाचरे, गोरख कोल्हे, सुरेश ठोकळ आदि शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.
सध्या ज्वारी पेरणीसाठी मशागत करावयाची असून, पंचनामे न झाल्यास ज्वारीचे पिक घेणे अवघड होणार आहे. याबाबत शासनाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जलद गतीने पंचनामे करावेत, अशी अग्रही मागणी शेतकरी करीत आहेत.
याबाबत चास मंडळाधिकारी रूपाली टेमक यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी कामगार तलाठी हर्षद कर्पे यांना शिवारफेरी करून बाधित क्षेत्राचा सर्व्हे करण्याबाबत सूचना दिल्या असल्याचे सांगितले.