Tanpure Sugar Factory : जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांवर राहुरीपेक्षा जास्त कर्ज असूनही ते चालू आहेत. काही तर प्रगतशील कारखाने म्हणून आपली पाठ थोपटून घेत आहेत. त्या मानाने डॉ. तनपुरे कारखान्याचे कर्ज फेडणे फार अवघड नाही;
मात्र त्यासाठी पक्ष, गट-तट बाजूला ठेवून राजकीय मंडळींना बाजुला ठेवून स्वच्छ व चांगल्या विचारांच्या निस्वार्थी लोकांच्या ताब्यात एक पंचवार्षिक दिल्यास या कारखान्याला गतवैभव प्राप्त करणे अवघड नाही, असे मत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी व्यक्त केले.
राहुरी येथील पांडुरंग मंगल कार्यालयात डॉ. तनपुरे बचाव कृती समिती आयोजित विचारविनिमय मेळाव्यात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अॅड. काळे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष अरूण कडू होते. तर मंचावर प्रतिभाताई घोगरे, अमृत धुमाळ, राजेंद्र शेटे, पंढरीनाथ पवार, अॅड. रावसाहेब करपे, बाळासाहेब विखे, सरपंच अर्जुन म्हसे, शैलेजा धुमाळ, श्रीमती पवार आदी उपस्थित होते.
अँड. काळे म्हणाले, या कारखान्याची डिस्टिलरी एक नंबरची आहे. २५ कि.मी.च्या आत ऊस उपलब्ध आहे. प्रामणिक माणसे प्रशासनात येण्याची गरज आहे. ही लढाई सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रपंचाशी निगडीत असल्याने राजकीय पुढाऱ्यांना गेट बंद करून स्वच्छ माणसं निवडावी लागतील.
यासाठी जिल्हा बँकेवरही धडक द्यावी लागेल. अन्यथा कारखाना कोणाच्या तरी घशात घालून भ्रष्टाचारी मंडळाचा सुटका करून घेतील. आज जिल्हा बँकेने जे कर्ज थकित म्हणून कारखान्यावर जप्ती आणली, ती मुळातच बेकायदेशीर आहे.
२०१७ नंतर कारखाना वैयक्तिक हमीवर कर्ज बँकेने दिले. त्यांनी कारखाना व्यवस्थित न चालवून कर्ज थकविले. ती जबाबदारी तत्कालीन संचालक मंडळाची आहे. कारखान्याच्या देण्यास तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार आहे. गै
रव्यवस्थापनाला जबाबदारी कोणाची, हे न्यायालयात निदर्शनास आणावे लागून जे देणे आपण देय नाही, त्यासाठी कारखान्यावर जप्ती आणणेच बेकायदेशिर असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रतिभाताई घोगरे यांनी कृती समितीला साथ द्या, आपण सदैव शेतकरी म्हणून या लढ्याला साथ देऊ, अशी ग्वाही दिली. यावेळी शेतकरी संघटनेचे अनिलराव औताडे, अरूण कडू आदींनी आपले विचार व्यक्त केले.
प्रास्तविक अमृत धुमाळ यांनी केले. आभार कामगार प्रतिनिधी भरत पेरणे यांनी मानले. यावेळी जालिंदर गाडे, पंढरीनाथ पवार, नानासाहेब गाडे, अॅड. संभाजी कदम, अशोक ढोकणे, बाबाकाका देशमुख, संभाजीराजे तनपुरे यांच्यासह कामगार, सभासद, आजी-माजी संचालक, पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.