अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- महाकृषी ऊर्जा अभियानात कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुमारे ६६ टक्के सूट देण्यात येत आहे. या योजनेत अहमदनगर जिल्ह्यातील ३ लाख ९५ हजार ८६८ शेतकऱ्यांकडे ५ हजार ३० कोटी ८२ लाख रुपयांची मूळ थकबाकी होती.
त्यातील १६४९ कोटी ८३ लाख रुपये महावितरणकडून निर्लेखन तसेच विलंब आकार व व्याजातील सवलतीद्वारे माफ करण्यात आले आहेत. तसेच वीजबिलांच्या दुरुस्तीद्वारे २ कोटी ५७ लाख रुपये समायोजित करण्यात आले आहेत.
आता या शेतकऱ्यांकडे ३३७८.४२ कोटींची सुधारित थकबाकी आहे. येत्या मार्च २०२२ पर्यंत त्यातील ५० टक्के म्हणजे १६८९ कोटी २१ लाख रुपये व चालू वीजबिलांचा भरणा केल्यास उर्वरित १६८९ कोटी २१ लाख रुपयेही माफ करण्यात येणार आहेत.
आतापर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील १ लाख ६० हजार ५१५ शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे. त्यांनी ७७ कोटी ४३ लाखांचे चालू वीजबिल व ४५ कोटी ३१ लाख रुपयांच्या सुधारित थकबाकीचा भरणा केला आहे.