अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. तसेच नव्याने रुग्ण आढळून येणाचे प्रमाण देखील कमी झाले असल्याची दिलासादायक बाब आहे.
कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट देखील 97 टक्के झाला असल्याने जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होत आहे. दरम्यान कोरोनामुळे गेली अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा आता हळूहळू सुरु करण्यात येत आहे.
राज्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. टप्प्याटप्प्याने या शाळांची उपस्थिती वाढत आहे.
राज्यात कोरोनाची साथ आटोक्यात आल्याने आता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत शासनाने सोमवारी (दि. १८) आदेश काढला आहे.
त्या अनुषंगाने नगर जिल्ह्यातही तयारी सुरू झाली असून, शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांना तशा सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंत २००३ शाळा असून, त्यात ३ लाख ७ हजार ७७७ विद्यार्थी आहेत.
या शाळांना ६ हजार ६१४ शिक्षक अध्यापन करत असून, आता त्यांच्या कोरोना चाचणी करण्याची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे.