अहमदनगर बातम्या

MP Sadashiv Lokhande : खा. लोखंडेंनी घेतला नगर-मनमाड महामार्गाच्या कामाचा आढावा

Published by
Ahmednagarlive24 Office

खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी येथे पुन्हा राष्ट्रीय राज्य महामार्गच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत अहमदनगर ते सावळीविहीर रस्त्याच्या कामाविषयी आढावा घेतला.

नगर- मनमाड महामार्ग दुरुस्त व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. ३ डिसेंबर रोजी कृती समितीच्या वतीने प्रशासनातील अधिकाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात वर्षाश्राद्ध घालून आंदोलन करण्यात येणार होते;

परंतु खा. लोखंडे यांनी रस्ता कृती समितीचे सदस्य व एनएचआय रस्त्याचे अधिकारी, ठेकेदार यांची बैठक लावत तात्काळ रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी निर्देश दिले होते. याच विषयास अनुसरून खा. लोखंडे यांनी शिर्डी येथे पुन्हा राष्ट्रीय राज्य महामार्गच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

खा. लोखंडे यांनी नगर -शिर्डी रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरवात झाल्याचे दिसत आहे. शुक्रवारी सायंकाळी खा. लोखंडे यांनी नगर ते शिर्डीला जोडणारा कोल्हार पुलाच्या कामाची पाहणी केली.

यावेळी प्रशांत लोखंडे, शिवसेना राहुरी तालुकाप्रमुख देवेंद्र लांबे, सतीश घुले, किशोर गोसावी, प्रकाश शिरसाठ, सदानंद शिरसाठ, राष्ट्रीय राज्य महामार्गाचे अभियंता अलोक सिंग, अनिल गोरड, ठेकेदार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी खा. लोखंडे म्हणाले, की नगर शिर्डी रस्त्याचा प्रश्न अधिक संवेदनशील झालेला आहे. या रस्त्यावर जगप्रसिद्ध शिर्डी साईबाबा व शनिशिंगणापूर येथील शनी देवाच्या दर्शनाला देश-विदेशातून भाविक येत असतात.

तसेच याच रस्त्यावरून जिल्ह्यातील मुख्य दळवळण व्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे या रस्त्याच्या विषयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घालण्यासाठी विनंती केली आहे. जोपर्यंत नगर शिर्डी रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही, स्वस्थ बसणार नाही, असे खा. लोखंडे म्हणाले.

यावेळी रस्ता दुरुस्ती कृती समितीचे देवेंद्र लांबे यांनी जोगेश्वरी आखाडा, राहुरी येथिल रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने चालू असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर खा. लोखंडे यांनी संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर उभे करून धारेवर धरत रात्रीच्या थंडीत चांगलाच घाम फोडल्याचे दिसून आले.

Ahmednagarlive24 Office