अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- महापालिकेत आमचे संख्याबळ नाही. त्यामुळे महापाैर निवडणुकीबाबत आम्ही कोणताच निर्णय घेऊ शकत नाही, असे भाजपचे खासदार डाॅ. सुजय विखे यांनी शनिवारी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी महापाैर निवडणुकीत भाजप कोणाला मदत करणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
खासदार विखे यांनी महापालिकेत घेतलेल्या बैठकीस महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, नगरसेवक अनिल बोरुडे, सुवेंद्र गांधी, भय्या गंधे, नरेंद्र कुलकर्णी, धनंजय जाधव, बारस्कर, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना विखे म्हणाले, राज्यात जसे आमचे संख्याबळ नाही, तसेच महापालिकेमध्येही नाही. आमच्याकडे महापाैरपदासाठी उमेदवारही नाही. त्यामुळे आम्ही दावा करण्याचे काही कारण नाही.
राष्ट्रवादीची साथ त्यावेळी घेतली होती ही वस्तुस्थिती आहे. कारण तेव्हा राज्यात महाविकास आघाडी नव्हती. आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. जसे मुख्यमंत्री होताना त्यांनी जसा निकष लावला होता, तसाच निकष ते इथेसुद्धा लावतील, अशी अपेक्षा आहे.
लसीकरण मोहीम सगळ्या ठिकाणी राबवली गेली पाहिजे, असे आम्ही प्रशासनाला सांगितले आहे. शहरातील लसीकरण केंद्रांची जी यादी प्रसिद्ध झाली, त्यात बदल करण्यास सांगितले आहे.
आता प्रत्येक प्रभागात मंगल कार्यालय निश्चित करण्यात आले आहे. तेथे उपकेंद्र तत्काळ सुरू केले जातील. लस उपलब्ध झाल्यानंतर तत्काळ दिली जाईल, असे खासदार विखे यांनी पत्रकारांना सांगितले.