अहमदनगर बातम्या

खासदार सुजय विखे म्हणाले…ठेकेदाराला धरून मारू का, हे तुम्हीच सांगा!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- शिर्डी यादरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्याने भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील चांगलेच संतापले आहेत. ठेकेदार काम करीत नाही, कोणाचे ऐकत नाही,

अशी तक्रार त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जाहीरपणे केली होती. नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान हा विषय निघाल्याने खासदार विखे संतापले आणि म्हणाले ‘खासदार म्हणून जे करायचे ते मी करीत आहे.

यापुढे जाऊन त्या ठेकेदाराला धरून मारू का? असा उद्विग्न प्रश्नच त्यांनी उपस्थितांना केला. शेवगाव शहरातील एका रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन डॉ. विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेवगावच्या आमदार मोनिका राजळे याही उपस्थित होत्या. यावेळी जिल्ह्यातील खराब रस्त्यांचा विषय निघाला.

त्यावर भाष्य करताना डॉ. विखे आक्रमक झाले. विखे म्हणाले, अहमदनगर -शिर्डी रस्त्याचे काम सध्या ठप्प झाले, त्याला जबाबदार ठेकादार आहे. त्याच्याविरूद्ध तक्रारी केल्या.

मात्र, उपयोग होत नाही. खासदार म्हणून मी आणखी काय करू शकतो? काम सुरू झाले तर तेथे उभा राहून ते करून घेऊ शकतो. मात्र, तो ठेकेदार जर यायलाच तयार नसेल तर कसे करायचे.

मी खासदार म्हणून पाठपुरावा करून थकलो आहे. आता तुम्हीच सांगा, त्याचे काय करायचे? धरून मारायचे का? की गुन्हा दाखल करायचा? काय करायचे ते आता तुम्हीच सांगा.

त्यासाठी मी सोशल मीडियात मोहीम सुरू करणार आहे. तेथे तुम्ही आपली मते मांडा. त्या आधारे मी दिल्लीत पाठपुरावा करतो. मात्र, मी जो मार्ग सांगणार आहे, तो तुम्हाला मान्य असला पाहिजे. त्यामुळे आधीच तुमची मते घेत आहे,’ असेही डॉ. विखे म्हणाले.

Ahmednagarlive24 Office