अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-अहमदनगर मध्ये पत्रकारांशी बोलताना शहराचे खासदार सुजय विखे यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करत खुले आव्हान दिले आहे.
अहमदनगरचे खासदार सुजय विखे पत्रकारांशी बोलताना म्हणाले कि , ‘केंद्र सरकारने केलेले कायदे चांगलेच आहेत. जरी त्यात काही त्रुटी वाटत असतील तर त्यात दुरूस्ती करण्याची सरकारची तयारी आहे.
यासंबंधी आंदोलनांसोबत आठ ते दहा वेळा चर्चा झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांचे एकमुखी नेतृत्व नाही. त्यामुळे त्यांना ही तडजोड मान्य होत नाही. मुळात हे आंदोलनच राजकीय प्रेरित असल्याने त्यांना तोडगा नकोच आहे, असेच दिसून येते.
महाराष्ट्राच्या सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आंदोलनास पाठिंबा असल्याचे सांगतात. मात्र, ज्या दिवशी यासाठी बंद पाळण्यात आला, त्या दिवशी आपल्याकडील सर्व बाजार समित्या आणि शेतकऱ्यांचे व्यवहार सुरळीत होते.
त्यांच्याच ताब्यातील बाजार समित्या ते बंद ठेवू शकत नाहीत. जर खरेच त्यांचा विरोध असेल तर त्यांनी शेतकऱ्यांना सांगून असा कडकडीत बंद पाळून दाखवावा, असे माझे त्यांना आव्हान आहे.
मात्र, हे त्यांना शक्य नाही. एका बाजूला फायद्यासाठी हे व्यवहार सुरळीत ठेवायचे आणि दुसरीकडे विरोध दाखवायचा, अशी दुटप्पी भूमिका या नेत्यांची आहे,’ असा आरोप खासदार सुजय विखे यांनी केला.