अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- विजेचा जबर शॉक लागल्याने मुलगी जखमी झाली तर शेळी ठार झाल्याची घटना नगर तालुक्यातील जेऊर येथे काल घडली. यावेळी नागरिकांनी महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
जेऊर येथील लिगाडे वस्तीवर विद्युत वाहिनी तुटल्याने जमिनीवर पडली होती. तेथे शेळ्या चारणारी मुलगी चैत्राली भाऊसाहेब तोडमल (वय १२) हिला विजेचा झटका बसल्याने जखमी झाली तर एक शेळी तारेला चिकटल्याने जागेवरच मरण पावली.
मागील आठवड्यात चापेवाडी रस्त्यावर विजेच्या तारा पडल्याने एका गाईचा व कुत्र्याचा मृत्यू झाला होता. विद्युत वाहिनी जमिनीवर पडलेली असताना याची कल्पना महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती.
तरीही दोन दिवस त्या तारा जमिनीवरच पडून होत्या. त्यामध्ये विद्युत पुरवठा चालू असल्याने ही दुर्घटना घडली. यामुळे परिसरातील नागरिकांनी महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.