अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- नागरिकांच्या अत्यावश्यक आणि तातडीच्या सुविधेसाठी काम करणाऱ्या छोट्या ठेकेदारांची मागील सात-आठ वर्षांपासूनची देयके मनपाने अजूनही अदा केलेली नाहीत. यामुळे सुमारे शंभरहून अधिक ठेकेदार हे मोडून पडण्याच्या मार्गावरती आहेत.
याला मनपाचे ढिसाळ आर्थिक नियोजन कारणीभूत आहे. या ठेकेदारांची बिले त्यांना तात्काळ मिळावीत यासाठी सुरू असणाऱ्या उपोषणाला भेट देवून शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेसचा पाठिंबा दिला आहे.
काँग्रेसचे नेते फारुक शेख यांनी मध्यस्थी करत शहर जिल्हाध्यक्ष काळे यांच्या समवेत ठेकेदारांची चर्चा उपोषणस्थळी घडवून आणली. यावेळी ठेकेदारांनी आपल्या व्यथा काळे यांच्या समोर मांडल्या.
शहराच्या विविध भागांमध्ये पाणी, गटारी, रस्त्यांवरील खड्डे अशा अनेक छोट-छोट्या दैनंदिन तातडीच्या कामांसाठी रु.५०,००० पर्यंतची कामे मनपाच्या कोटेशनवर छोटे ठेकेदार करत असतात.
या ठेकेदारांद्वारे होणाऱ्या तातडीच्या छोट्या दुरुस्तीच्या कामांमुळे नागरिकांना दिलासा मिळत असतो. मात्र मनपाचे काम प्रामाणिकपणे पूर्ण करून देखील मागील सात-आठ वर्षांची बिले अजुनही मनपाने या ठेकेदारांना अदा केलेली नाहीत.
ठेकेदारांनी कर्ज काढून, सोने गहाण ठेवून ही कामे केली आहेत. या ठेकेदारांनी काम करणे बंद केल्यास त्याचा नागरिकांना तातडीच्या सुविधा मिळण्यावर विपरीत परिणाम होऊन फटका बसू शकतो. असे ते म्हणाले.