महापालिका: स्थायी समितीच्या सभेत पथदिव्यांच्या उजेडावरून ठेकेदारावर आरोप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- शहरात महापालिकेकडून बसविण्यात आलेल्या पथदिव्यांच्या उजेडावरून स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी ठेकेदारावर नाराजी व्यक्त केली. 60 वॅटचे दिवे बसविण्यात येतील असे सांगितले गेले होते.

प्रत्यक्षात मात्र 16 अन् 24 वॉटचे दिवे बसविले जात आहेत. ठेकेदार मनमानी पध्दतीने कारभार करत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.

स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांच्या अध्यक्षस्थेखाली मंगळवारी समितीची ऑनलाईन सभा झाली. यावेळी समिती सदस्य नगरसेवक प्रकाश भागानगरे, रवींद्र बारस्कर,  मुद्दस्सर शेख, शाम नळकांडे, समद खान, मनोज कोतकर, सचिन शिंदे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पटारे, उपायुक्त यशवंत डांगे आदी उपस्थित होते.

इतर विभागप्रमुख ऑनलाईन सहभागी झाले होते. अहमदनगर शहरात 25 हजार पथदिवे बसविण्यात येणार आहेत. आतापर्यंत नऊ हजार दिवे बसविण्यात आले आहेत.

हे काम मात्र धिम्या गतीने सुरू आहे. मुदतीत काम पूर्ण करण्याची मागणी सदस्यांनी केली. पथदिव्यांचे काम तातडीने व योग्यरितीने मार्गी लावण्याचे आदेश सभापती घुले यांनी विद्युत विभागाला दिले.

तर या कामाला गती दिली जाईल असे उपायुक्त डांगे यांनी सांगितले. दरम्यान महापालिकेच्या अग्नीशमन विभागातील गाड्यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.

सध्या दोन गाड्या असून त्याही दहा वर्षांपूर्वीच्या आहेत. तिसरी गाडी खरेदी करण्यात आली असली तरी ती सेवेत दाखल झालेली नाही. अशा परिस्थितीत शहरात कुठे दुर्घटना घडली तर त्यावर कसे नियंत्रण मिळवायचे.

असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. अग्नीशमन विभागासाठी तीन वाहने खरेदी कण्यासंदर्भात येत्या दोन दिवसांत प्रस्ताव सादर करा, या संदर्भात पालकमंत्र्यांकडे निधीची मागणी करणार असल्याचे सभापती घुले यांनी सांगितले.