अहमदनगर बातम्या

मनपा संपूर्ण शहराचा कचरा बुरुडगाव ग्रामस्थांच्या माथी मारत आहे

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  बुरुडगाव येथील कचरा डेपो बंद करण्यात यावा या मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्यावतीने शिवसेना उपशहरप्रमुख जालिंदर वाघ यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना दिले.

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने तातडीने हा कचरा डेपो बंद करावा अशी मागणी होऊ लागली आहे. आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बुरुडगाव येथे महापालिकेचा कचरा डेपो आहे.

येथे शहरातील कचरा, घाण व इतर सर्व टाकावू पदार्थ टाकण्यात येतात. त्यास बुरुडगावच्या नागरिकांचा पहिल्यापासून विरोध होता.

सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना ग्रामपंचायत प्रशासनाने १० सप्टेंबर २०२० रोजी मनपास ना हरकत प्रमाणपत्र (दाखला) काही अटी व शर्तीने दिला होता.

परंतु मनपाने सदर अटी व शर्तीचे पालन केलेले नाही त्यामुळे गावकऱ्यांनी ग्रामसभा घेवून ना हरकत दाखला रद्द करण्याची मागणी केली. तसा ठरावही करण्यात आला.

याप्रसंगी जालिंदर वाघ म्हणाले, मनपा ने स्थापनेनंतर संपूर्ण शहरासाठी विकास आराखड्यामध्ये सावेडी, केडगाव व बोल्हेगाव या ठिकाणी कचरा डेपोसाठी जागा आरक्षित केली आहे.

म्हणून बुरुडगांव येथे कचरा डेपो असण्याचा काही एक संबंध येत नाही. तरी मनपा संपूर्ण शहराचा कचरा बुरुडगाव ग्रामस्थांच्या माथी मारत आहे. मनपाने येथील कचरा डेपो तात्काळ बंद करावा.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office