Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून हॉटेल चालकाचा खून झाल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. पहाटे झोपेत असताना एका हॉटेल चालकाचा डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करत निघृण खून करण्यात आला.
ही घटना श्रीरामपूर नेवासा मार्गावरील लोखंडी फॉलजवळ बेलपिंपळगाव शिवारात बुधवारी पहाटे घडली. बाळासाहेब सखाहरी तुवर (वय ६०) रा. कारवाडी (पाचेगाव) ता. नेवासा असे खून झालेल्या हॉटेल चालकाचे नाव असल्याची माहिती समजली आहे.
ओम साई नावाचा हॉटेल की जे श्रीरामपूर नेवासा मार्गावरील लोखंडी फॉल नजीक आहे ते हॉटेल ते चालवत होते. बुधवारी (दि.१३ मार्च) पहाटेच्या सुमारास झोपेत असताना त्यांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.
घटनेची माहिती समजताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली.
याबाबत मयताचा पुतण्या विष्णू गंगाधर तुवर (वय ३७) रा. पाचेगाव यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले की, आमच्या गावामध्ये माझे चुलते बाळासाहेब सकाहरी तुबर हे कुटुंबासह राहावयास असून त्यांनी बेलपिंपळगाव शिवारात लोखंडी फॉल येथे नानासाहेब संत यांचे चहा व वडापावचे हॉटेल ८ महिन्यापासून भाड्याने चालवायला घेतले आहे.
दिवसभर हॉटेल चालवून चुलती यशोदा हिस जवळच असलेल्या कारवाडी (पाचेगाव) येथील राहते घरी रात्री ९ वाजेच्या सुमारास सोडवून पुन्हा त्यांचे हॉटेल ओमसाई येथे रात्री दहा वाजता हॉटेल बंद करून तेथेच ते झोपले.
१३ मार्च रोजी सकाळी ८-३० वाजेच्या सुमारास मला माझे नातेवाईक दादा बाबुराव पवार, रा. कारवाडी यांचा फोन आला व त्यांनी मला फोनवर सांगितले की, तुमचे चुलते बाळासाहेब हे हॉटेलमध्ये जखमी अवस्थेत पडलेले आहे.
मी, माझा भाऊ शंकर गंगाधर तुवर, दाजी राजेंद्र गंगाधर पवार असे आम्ही गेलो असता ते हॉटेलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात अंथरुणावर पडलेले आम्हाला दिसले. त्यांच्या डोक्याला जखम होऊन कानातून रक्त येऊन त्यातच ते मयत झाल्याचे दिसले.
त्यानंतर नेवासा येथील पोलीस आले त्यांनी चुलते बाळासाहेब सखाहारी तुवर यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे घेऊन गेले.
या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. २५१/२०२४ भारतीय दंड विधान कलम ३०२ प्रमाणे अज्ञात व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.