Ahilyanagar News:- कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघांमधून महायुतीचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांचा पराभव झाला व या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे रोहित पवार यांनी विजयश्री खेचून आणली. मतमोजणीच्या दिवशी अखेरच्या टप्प्यापर्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत अवघ्या 1247 मतांनी प्राध्यापक राम शिंदे यांचा पराभव झाला.
परंतु आता या घटनेने वेगळेच राजकीय वळण घेतल्याचे दिसून येत असून रोहित पवार व अजित पवार यांच्या भेटीचा जो काही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यावरून राम शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे व कर्जत जामखेडमध्ये माझा पराभव हा नियोजित कट होता व यात माझा बळी गेला अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांनी केले आहे.
काय आहे नेमका व्हायरल झालेला व्हिडिओ?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कराड मधील प्रितिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले व यावेळी अजित पवारांनी आमदार रोहित पवार समोरासमोर आल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत असून यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार यांचे चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
या दरम्यान अजित पवार यांनी रोहित पवार यांना उद्देशून म्हटले की, “ बेट्या थोडक्यात वाचलास, माजी सभा झाली असती तर…’ असे म्हणत अजित पवार यांनी रोहित पवार यांना टोला लगावला. यावर बोलताना भाजप नेते आमदार राम शिंदे यांनी अशा पद्धतीची नाराजी व्यक्त केली.
काय म्हटले राम शिंदे यांनी?
यावर बोलताना राम शिंदे यांनी म्हटले की, या सगळ्या प्रकरणावर मला मीडियासमोर काही बोलायचे नव्हते. परंतु स्वतः अजित पवार या विषयावर बोलले व त्यामुळे मला या विषयावर आता बोलल्याशिवाय पर्याय नाही. या सगळ्या प्रकरणावर पक्षश्रेष्ठींसोबत मी आधीच बोललो आहे.
महायुतीचा जो काही धर्म होता तो मोठ्या नेत्यांनी पाळायला हवा होता व माझ्यासारख्या छोट्या शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या व्यक्तीने बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढा दिला. राज्यात कमी फरकाने पराभूत झालेल्या उमेदवारांमध्ये माझे नाव आहे मला एक लाख 26 हजार मते मिळाली.
परंतु माझ्या विरोधात अघोषित कारवाईचा कटाचा मी बळी ठरलो असल्याचे देखील त्यांनी म्हटले. महायुती मधील वरिष्ठ नेत्यांकडे अशा पद्धतीची तक्रार करण्यापेक्षा जर त्यांच्यावरच अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होत असेल तर हे चांगले नसल्याचे देखील त्यांनी म्हटले.
तसेच फेरमतदान मोजणीसाठी अर्ज केला होता पण तो देखील फेटाळण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले व आज मी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाणार असल्याचे देखील त्यांनी बोलताना नमूद केले.