अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तालुक्यात नकली नवरी बनून लोकांना फसविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-फसवणुकीच्या प्रकारात तपास करताना पैसे कमविण्यासाठी नकली नवरी उभी करुन नकली लग्न लावणारी टोळी उघड झाली असून यात श्रीरामपुरातील दोघा जणांची फसवणूक झाल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी आज श्रीरामपूर येथे पत्रकार परिषदेत दिली.

आज जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला भेट दिली. यावेळी पाटील यांनी पत्रकारांना श्रीरामपूरमध्ये घडलेल्या फसवणुकीच्या प्रकरणाची माहिती दिली.

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. या फसवणुकीच्या गुन्ह्यात तपास करत असताना डीवायएसपी संदीप मिटके, भापोसे आयुष मोपाणी यांना हे प्रकरण काहीतरी वेगळेच असल्याचा संशय आला.

त्यामुळे पोलिसांनी मध्यप्रदेशला एक पत्र पाठविले. त्या ठिकाणी सदर महिला ही एका गँगची सदस्य असल्याचे पुढे आले. या महिलेने एका मुलीचे दुसऱ्याशी लग्न लावून दिल्याचे आढळून आले.

१० ते १२ जणांची ही टोळी असून लग्न होत नाही, असे लोक शोधायचे त्यांच्याशी ओळख निर्माण करायची. त्यानंतर आपल्या गॅंगमधली मुलगी दाखवायची आणि तिला नवरी म्हणून उभे करायचे.

हुंडा म्हणून पैसे, दागिने घ्यायचे आणि नंतर सदर नकली नवरीही संबंधीत नवरदेवाशी भांडण करुन निघून यायची. अशाप्रकारे हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे पोलीस तपासात पुढे आले.

आतापर्यंत श्रीरामपुरातील चौघा जणांची अशाप्रकारे फसवणूक झाल्याचे पुढे आले.परंतु इज्जतीचा पंचनामा नको म्हणून लोक फिर्याद देण्यासाठी पुढे येत नाही.त्यामुळे आता पोलीसच या प्रकरणात फिर्यादी होणार आहेत.

अशाप्रकारे लोकांची फसवणूक करणारी टोळी केवळ मध्यप्रदेशमध्ये नाहीतर महाराष्ट्राच्या अनेक भागात अशा टोळ्या कार्यरत आहेत. त्यांची फसवणूक करण्याची पद्धतही सारखी आहे.

लग्नसमारंभात तसेच केटरिंगमध्ये वाडपी मुलींशी हे लोक संपर्क करतात आणि पैशाचे अमिष दाखवून आपल्या फसवणुकीच्या धंद्यात त्यांना ओढतात. त्यामुळे नागरिकांनी याबाबत जागरूक रहाण्याची गरज असल्याचे आवाहन एसपी मनोज पाटील यांनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24