अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- राज्य सरकारने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे नगर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य संख्या असणारा जिल्हा होणार आहे.
जिल्ह्यातील जिल्हापरिषद सदस्यांची संख्या आता ७३ वरून ८५ होणार असून पंचायत समिती सदस्यांची संख्या १४६ वरून १७० होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.२९) मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली.
त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातील विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. ही सदस्या संख्या वाढणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय गणितेही बदलणार आहेत.
नगरमध्ये जिल्हा परिषदेच्या ७३ जागा होत्या त्या आता ८५ होणार आहेत. येथे तब्बल १२ जागा वाढणार आहेत. त्यानंतर नाशिकमध्ये ७३ जागा होत्या त्या आता ८४ होणार आहेत. तर राज्यात सर्वात लहान जिल्हा परिषद सिंधुदुर्ग असणार आहे.
येथील सदस्य संख्या ५५ असणार आहे. याच्या दुप्पट पंचायत समिती सदस्य असतील. राज्यात सध्या जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० व जास्तीत जास्त ७५ इतकी आहे.
त्यामध्ये वाढ होऊन ती आता कमीत कमी ५५ आणि जास्ततीत जास्त ८५ असणार आहेत. यामुळे पुन्हा नव्याने गटांची रचना आणि आरक्षण जाहीर होणार आहे.