नगर अर्बन बँक प्रकरण; पोलिसांना गरज भासेल तेव्हा… ! ‘या’ अटीवर ‘त्या’ बंधूंना अटकपूर्व जामीन मंजूर

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : नगर अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे कर्जदार सुशील हनुमानदास सारडा व संजय हनुमानदास सारडा या बंधूंना नुकताच खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.

पोलिसांना तपासात आवश्यक ते सहकार्य करण्याच्या अटीवरन्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. याप्रकरणात सारडा बंधूतर्फे ऍड .आशिष जाधवर यांनी काम पाहिले व त्यांना ऍड.अरविंद एस. काकाणी यांनी सहकार्य केले.

अर्बन बँक बोगस कर्ज घोटाळा प्रकरणी मोठ्या संख्येने आरोपी आहेत. मात्र मोठ्या या घोटाळ्याने १०९ वर्षे जुनी बँक बंद पडली. यामुळे बँकेत ठेवलेल्या ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. विशेष म्हणजे या घोटाळ्यात संचालक, बँकेचे अधिकारी यांच्यासह १०० पेक्षा जास्त आरोपींची संख्या असून, अनेक बोगस कर्जदार सामील आहेत.

ज्या व्यक्तीची कुवत हजार रुपये भरण्याची नाही, त्याच्या नावे कोटी-कोटी रुपयांचे कर्जे देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, कर्ज दिल्यानंतर कर्जातील काही रक्कम संचालकांच्या खात्यावर जमा झाली आहे.तसे फॉरेन्सिक ऑडीटमध्ये आढळून आले आहे.

दरम्यान अहमदनगर मधील सारडा बंधु यांनी मे. झुंबरलाल सीताराम सारडा या फर्मचे भागीदार या नात्याने नगर अर्बन बँकेकडून घेतलेल्या कर्ज प्रकरणात अनियमितता आल्याचे फॉरेन्सिक ऑडीटमध्ये आढळून आले होते.

अर्थात सारडा बंधुंनी कर्जाची सर्व रक्कम व्याजासह परतफेड केली होती तसेच कर्ज परतफेड केल्यामुळे बँकेने त्यांची मिळकत गहाणमुक्त केली होती.

त्यामुळे त्यांनी प्रथम अहमदनगर येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र तो अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी खंडपीठात अपिल दाखल केले होते. या अपिलाची गुणदोषावर सुनावणी होऊन खंडपीठाने, कर्जदारांनी कर्जाच्या संपूर्ण रकमेचा भरणा केल्याने व त्यांना बँकेने तारण मिळकत गहाणमुक्त करुन दिल्याने या प्रकरणात त्यांची अटक जरुरी नाही, असे मत व्यक्त करुन त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

सारडा बंधूंनी त्यांना देय असलेली सुमारे दोन ते अडीच कोटीची रक्कम एक रकमी कर्ज परतफेड योजनेच्या माध्यमातन भरली होती. त्यामुळे बँकेने त्यांची मिळकत गहाणमुक्त करून दिली होती.

पैसे भरल्याने बँकेचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही, असा निष्कर्ष खंडपीठाने व्यक्त केला. फक्त, पोलिसांना गरज भासेल तेव्हा तपासात सहकार्य करण्याची सूचना केल्याची माहिती ऍड.काकाणी यांनी दिली.

Ahmednagarlive24 Office