नगरी माणसे माणुसकी जपणारी ,कामाला येथेच येऊ….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- आज राहत केंद्राद्वारे १९३ परप्रांतीय  श्रमिकांना राज्य परिवहन महामंडळाद्वारे त्यांच्या घरी पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली. याशिवाय  खासगी वाहनांमधून ३१३ लोकांना घरी रवाना करण्यात आले. काल ८८ परप्रांतीयांना शासकीय सुविधेद्वारे मोफत तर १८४ श्रमिकांना खाजगी वाहन वाहनांद्वारे रवाना करण्यात आले.

जाताना सर्वांना शिजवलेले अन्न, तहान आणि भूक लाडू , गरजेनुसार औषधे सोबत दिलेली होती. भारतमातेच्या जयघोषात २ महिने अखंड  शिणलेल्या श्रमिकांना सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते निरोप देत होते. शारीरिक अंतर राखण्याच्या नियमामुळे गळाभेट शक्‍य नव्हती. परंतु आनंदाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू गाळत रांची (झारखंड ) येथील समाली तीप्पो म्हणाला, “तुम्ही नगरी माणसे  माणुसकी जपणारी आहात.आम्ही पुन्हा कामाला येथेच येऊ…..”

चाकण, पिंपरी,  पुणे आणि दक्षिण महाराष्ट्रातून चालत आलेल्या श्रमिकांची यशस्वी घरावापसी मिशन राहत द्वारे करण्यात आली. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश कडे जाणाऱ्यांना धुळे जिल्ह्याच्या तर छत्तीसगड,बंगाल,बिहार आणि ओडिशा येथील नागरिकांना येथपर्यंत सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. या मजुरांमध्ये २९ जोडपी आणि त्यांची मुले, ३८ ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश होता .

 स्नेहालय  आणि अनाम प्रेम या संस्थांकडे उपलब्ध असलेली सर्व सार्वजनिक  वाहने, “राहत टीम” सोबत जोडलेल्या कार्यकर्त्यांची खाजगी वाहने, यातून मागील ७२ तासात रस्त्याने पायी जाणाऱ्या श्रमिकांना राहत केंद्रात आणण्यात आले . त्यांचे समुपदेशन करून कागदपत्र तयार करून आणि प्रशासनाशी समन्वय साधून त्यांच्या घर वापस योजना यशस्वी करण्यात आली. मागील २ दिवसांपासून आणले जाणारे श्रमकरी राहत केंद्रावर विश्रांती घेत होते. त्यांची जेवण,संडास-बाथरूम-पाणी- जुजबी औषध उपचार  यांची व्यवस्था राहत टीम ने केली. मास्क, पादत्राणे, अत्यावश्यक कपडे त्यांना पुरविण्यात आले.

आरामदायक आणि मोफत प्रवासासाठी  राहत केंद्रावर किमान एक दिवस  मुक्काम करावा लागणार, हे या मजुरांना  समजवण्यात  यश आले. “आम्ही पायी जाऊ , कारण प्रवास भाड्याचे  पैसे नाहीत,  आम्हाला येथे १४ दिवस विलागीकृत  करतील…”, अशी मजुरांची धारणा होती.

राहत केंद्रावर तणाव कमी  करण्यासाठी मध्यप्रदेश मधील  शिवसागर सुंदर आवाजात आदिवासी गाणे म्हणत होता. झारखंड बंगाल ओरिसा येथील श्रमिक आपापला लहजा आणि मातीतील गाणी एकमेकांना ऐकवीत होती. टीम राहत ने देखील मराठी मुलुख ऐकवला .आंतरभारतीची अनुभूती येथे सर्वांना दोन दिवस मिळाली.

भूक आणि कोरोनाची भीती, संपलेले पैसे आणि पोलिसांची दंडेली , काही ठिकाणी ठेकेदार आणि मालकांनी बुडवलेले पगार आणि घरच्यांना वाटणारी काळजी  , यामुळे गर्व आपसी सुरू केल्याचे सर्वांनी सांगितले. तथापि पुन्हा महाराष्ट्रात येऊनच काम करण्याची इच्छाही व्यक्त केली.

या सर्व मजुरांना स्नेहालय स्कुलबस द्वारे तारकपूर आगारात आणले.  सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कल्पेश सूर्यवंशी  , सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जागृती फटांगरे,वाहक देवराम गीते, परिवहन  निरीक्षक  अविनाश गायकवाड, आरोग्यसेवा देणारे डॉ.सौरभ मीस्सर, डॉ.अमित पालवे,डॉ.शुभांगी सुर्यवंशी,नायब तहसीलदार उर्मिला  पाटील, तहसीलदार उमेश पाटील, परिवहन विभागाचे गीते साहेब यांनी केलेल्या अहोरात्र सेवेबद्दल राहत टीम आणि सर्व संलग्न संस्था संघटनांतर्फे त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

असामान्यत्वाला सलाम.

तारकपूर येथील परिवहन आगारात पाणी-अन्न अशी सोय गर्दीमुळे अपुरी  पडते . हे पाहून राहत टीमने  बिस्किटे-पाणी भेळभत्ता इत्यादीचा मोफत वाटप स्टॉल आपल्या वाहनातून चालविला.

बस आगारात अविनाश मेमाणे,सतीश लोढा, सुनील आहुजा, नागर देवळे (ता.नगर) येथील तरुण शेतकरी विजय खरपुडे  हे कार्यकर्ते  स्व-खर्चाने बिस्किटे,बालकांना-गर्भवती महिलांना दूध देत होते. या सर्वांचेच कृतज्ञता राहत टीमने व्यक्त केली. जाताना  सर्व मजूर   जय हिंद ,भारत माता की जय आणि जय महाराष्ट्र सोबतच जय नगर ही घोषणाही  देत होते.

मोटार वाहन निरीक्षक संतोष माने ,राहुल  धनंजय देवकर, श्रीराम पुंडे- गोरक्ष कोरड, हनुमंत पारधी या परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांची कृतज्ञता राहत पिग्मी व्यक्त केली.

नगर तालुक्याच्या  नायब तहसीलदार प्रविणा तडवी , सहाय्यक परिवहन निरीक्षक  दीपक पाटील आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे  गीते , यांची अनमोल  मदत  मजुरांची पायपीट थांबवण्यात मिळाली. राहत टीम तर्फे  स्नेहप्रेम संस्थेचे फारुख बेग , राहत केंद्राचे संयोजक अजित कुलकर्णी, डॉ. महेश मुळे संजय हरकचंद गुगळे यांनी  घरवापसी साठी मदत करणाऱ्या सर्वांची कृतज्ञता व्यक्त केली .

हेल्पिंग हॅण्ड फोर हांगर्स,पीस फाउंडेशन, सकल जैन समाज ,यांच्याप्रमाणेच असंख्य कॉलनी आणि वसाहतीमधील नागरिकांनीही घरोघरी पोळ्या – भाजी बनवून फूड पॅकेट्स राहत केंद्रात रोज आणून दिले.

मागील २४ तासात ३५०० पेक्षा अधिक लोकांनी राहत केंद्राचा  लाभ घेतला. ३१ मे २०२० पर्यंत राहत केंद्र कार्यान्वित राहणार असल्याचे संगीता सानप, अंजली डाबी, श्याम आसावा, अनिकेत कौर, हनीफ शेख यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24