समृद्धी महामार्गाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समृद्धी महामार्ग असे नाव द्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-समृद्धी महामार्गाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समृद्धी महामार्ग असे नाव द्यावे, महामार्गाच्या कामामुळे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान भरून द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने कोपरगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.

उपोषणाचा कालचा दुसरा दिवस होता. सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ, शेतकरी भाऊसाहेब दहे, जिल्हा कार्याध्यक्ष पप्पु शेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक विभागीय आयुक्त, अहमदनगर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने हे उपोषण सुरू करण्यात आले. संघटनेच्या वतीने सांगण्यात आले, की समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे. शेतकऱ्यांना शासकीय अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्यामुळे संघटनेने हा विषय हाती घेतला.

यासाठी प्रशासनास निवेदने दिली. त्यानंतर ठेकेदार कंपनीस दंडही झाला. मात्र त्याची वसुली अजून झालेली नाही. उलट अधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या मिळाल्या. दंड वसूल करून शेतकऱ्यांना भरपाई देणे गरजेचे आहे.

उप ठेकेदारांनी येथील तरुणांच्या वाहनांचे पैसे थकविले आहेत, तेही मिळावेत, तोपर्यंत ठेकेदार कंपनीला उत्खनन परवाने देऊ नये, काही दिवसांपूर्वी संघटनेने महामार्गाचे कामही थांबविले होते. येथून पुढे ज्या ठिकाणी उत्खनन करायचे असेल,

तेथील क्षेत्राच्या शेजारच्या शेतकऱ्यांचे सहमतीपत्र घेणे गरजेचे करावे, २१ फुटापेक्षा खाली उत्खनन करण्यात येऊ नये, आतापर्यंत कोपरगाव तालुक्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, ओहोर लोड वाहतुक बंद करण्यात यावी, आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24