त्या भ्रष्ट पोलिसांची नावे कळवा; प्रभारी पोलीस अधीक्षकांनी केले आवाहन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. या अवैध धंद्यांना पोलीस प्रशासनाचे देखील सहकार्य असल्याच्या अनेकदा चर्चा रंगल्या होत्या. यामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा देखील मालिन होऊ लागली होती.

आता अशा भ्रष्ठ पोलिसांच्या विरोधातच कारवाईसाठी खुद्द प्रभारी पोलीस अधीक्षकांनी पाऊले उचलली आहे. अवैध धंद्यांना पायबंद घालण्यासाठी डॉ. राठोड यांनी कंबर कसली आहे. त्यांनी जिल्ह्यातील वाळूतस्कर आणि अवैध धंदेचालकांची माहिती गोळा करण्यास सुरवात केली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वाळूतस्कर वा अवैध धंदेचालकांशी संबंध असल्यास, त्यांची नावे तत्काळ पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकांना बंद लिफाप्यात कळवावीत, असा आदेश प्रभारी पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी दिला आहे.

त्यामुळे प्रभारी पोलिस ठाणेप्रमुखांचे धाबे दणाणले आहे. नूतन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कोरोनाबाधित झाले. त्यामुळे अपर पोलिस अधीक्षक डॉ. राठोड यांच्याकडे प्रभारी पोलिस अधीक्षकांची सूत्रे आहेत.

डॉ. राठोड यांनी स्वतंत्र पोलिस पथक तयार करून, गेल्या काही दिवसांपासून नगर शहर व परिसरातील अवैध धंद्यांवर छापे घालण्यास सुरवात केली. जिल्ह्यातील सर्व पोलिस उपअधीक्षक व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांना आदेश काढले आहेत. त्यात म्हटले आहे,

की वाळूतस्कर व अवैध धंदेचालकांशी संबंध असणारे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची नावे गोपनिय पद्धतीने पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवावीत.

पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व विभागाचे पोलिस उपअधीक्षकांनी अशी नावे न पाठविल्यास कर्तव्यात कसूर केल्याचा अहवाल पोलिस महानिरीक्षकांना पाठविण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, या आदेशाने पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24