अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Ahmednagar News :- केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या काल राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात महाराष्ट्राने अनेक पुरस्कार पटकावले आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट पंचायत समिती पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील राहाता पंचायत समितीला मिळाला आहे.
याशिवाय लोहगाव या ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत विकास आराखडा पुरस्कार मिळाला आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या वर्षीचा सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कार कोल्हापूर जिल्हा परिषदेला जाहीर झाला आहे.
सर्वोत्कृष्ट पंचायत समिती पुरस्कारामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील राहाता आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या पंचायत समित्यांची निवड करण्यात आली आहे.
उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारांमध्ये राज्यातील १७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेला ५० लाख रुपये, सर्वोत्कृष्ट पंचायत समित्यांना प्रत्येकी २५ लाख रुपये आणि उत्कृष्ट ग्राम पंचायतींना लोकसंख्येप्रमाणे ५ ते १५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम पुरस्कार स्वरुपात ग्राम पंचायतीच्या खात्यात थेट हस्तांतरित करण्यात येणार आहे.