अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यासह नगर जिल्ह्यात लॉकडाऊन तसेच कठोर निर्बंध लागू करण्यात आले होते. यातच लॉकडाऊननंतर सुमारे ५ महिन्याने शिर्डी येथील श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.
आज पहिल्याच दिवशी तब्बल ११ हजार साईभक्तांनी सामाजिक अंतराचे पालन करुन श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला.
राज्य शासनाच्या आदेशाने गुरुवारी (दि.७) पासून पहाटेच्या काकड आरतीनंतर श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांनादर्शनासाठी खुले करण्यात आले असून, दिवसभरात सुमारे ११ हजार साईभक्तांनी साईंच्या दर्शनाचा लाभ घेतला.
तसेच पहिल्याच दिवशी ८ लाखांची देणगी प्राप्त झाल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.
दरम्यान कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ५ एप्रिल २०२१ पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले होते.
२४ सप्टेंबर रोजी राज्य शासनाने ७ ऑक्टोबर २०२१ पासून घटस्थापनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील सर्व धार्मिकस्थळे काही अटी-शर्तीवर खुले करण्याचे आदेश दिलेले आहेत.
श्री साईबाबांचे मंदिर खुले झाल्यामुळे व संस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत साईभक्तांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर भाविकांकडून देखील नियमांचे योग्यरीत्या पालन केले जात आहे.