राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने दावा केला असून, उमेदवार कोणीही असो, पण तो अजित पवार गटाचाच असेल. यासंदर्भात मुंबई येथे चर्चा झाली असल्याची माहिती राहुरीचे शहराध्यक्ष सुनील भट्टड यांनी दिली.
भट्टड म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी अगोदर ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, ते मतदारसंघ अजित पवार गटालाच मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यासंबंधी उपमुख्यमंत्री अजित पवार हे अंतिम निर्णय घेणार असून, राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटालाच सुटणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार सुजय विखे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, देवळालीचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या नावासह सक्षम उमेदवार देण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
मतदारसंघात विविध विकासकामे करायची असतील, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकप्रतिनिधी असणे गरजेचे आहे. सध्या कोणताही ठोस विकास दिसत नाही. ठराविक ठेकेदारांनाच कामे दिली जातात. त्यातही ती अत्यंत निकृष्ट दर्जाची असतात. टक्केवारीचा विषय सर्वत्र चर्चेला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, त्यावेळी राहुरीतही त्यांचा भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. त्यावेळी अनेकांचा पक्षप्रवेश होणार असून, राष्ट्रवादी पक्ष अधिक जोमाने वाढतच जाईल. अजित पवार यांनी राहुरीमध्ये निधी देताना कधीही हात आखडता घेतला नाही, असे असताना त्यांच्यावर नाहक टीका केली जाते, याचे सडेतोड उत्तर लवकरच दिले जाईल.
राहुरी-श्रीरामपूर-कोपरगाव अकोले या तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार दौरे करणार असून, त्यावेळी उमेदवारांची चाचपणीही केली जाणार आहे. नगर जिल्ह्यात किमान सहा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहेत. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातही अत्यंत सक्षम उमेदवार आमच्याकडे असून, लवकरच तेथील उमेदवारांची नावही जाहीर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राहुरी येथील ग्रामीण रुग्णालय व प्रशासकीय इमारत राहुरी शहरातच व्हावी, या मताचे आम्ही असून, त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांचे लक्ष वेधणार आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असताना आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यासंदर्भात आरोग्यमंत्री तान्हाजी सावंत यांनी बैठक घेतली, मात्र जागेचा वाद न्यायप्रविष्ठ असल्याची माहिती त्यांना नसावी, असे भट्टड यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीतील उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना राहुरीतून १२ हजार मतांचे लीड होते. विधानसभा निवडणुकीत त्यात आणखी वाढ होईल, असा दावा त्यांनी केला. वरिष्ठ पातळीवर महायुतीतील नेते एकत्र बसून, कोणत्या जागा कोणाला द्यायच्या, यासंदर्भात लवकरच बैठक घेणार आहेत.
त्यात नगर जिल्ह्याचाही समावेश असेल, त्यावेळी जिल्ह्यातील किमान सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. राहुरीची कामधेनू तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचेही भट्टड यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब रामदास ढोकणे उपस्थित होते.