अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- तालुक्यातील जवळे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणाच्या तपासात दिवसेंदिवस गुंतागुंत वाढत आहे.
पीडितेच्या निकटवर्तीय व्यक्तीने हत्या घडवून आणली असावी या निष्कर्षाप्रत पोलिस आले आहेत. त्यादृष्टीने तपासाला गती देण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी नगर औद्योगिक वसाहत परिसरातील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आतापर्यंत सुमारे ४० संशयितांची चौकशी करण्यात आली आहे.मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. २१ ऑक्टोबर रोजी जवळे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.
तपासाची सर्व भिस्त आता तांत्रिक मुद्द्यांवर व न्यायवैद्यक पध्दतीने केलेल्या विश्लेषणावर अवलंबून आहे. न्यायवैद्यक तपासणीतून व विश्लेषणातून पुढे आलेल्या काही निष्कर्षामुळे संशयाची सुई निकटवर्तीय व्यक्तीच्या दिशेने फिरली आहे.
न्यायवैद्यक पथकाच्या सहकार्याने करण्यात आलेल्या शवविच्छेदनात पीडितेच्या नखात आढळून आलेले त्वचेचे छोटे तुकडे, केस याचे विश्लेषण करण्यासाठी पाच संशयितांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी संशयितांचे त्वचा व केसांचे नमुने घेण्यात आल्याचे समजते.
डीएनए चाचणी तसेच इतर तपासण्यांचे अहवाल नाशीक येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून प्राप्त झाल्यानंतर गुन्ह्याचा उलगडा होईल, अशी खात्री वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना आहे.
तपासाचे सर्व हातखंडे वापरुनही काहीच निष्पन्न होत नसल्याने न्यायवैद्यक शास्त्रानुसार तांत्रिक मुद्द्यांवर तसेच परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे तपास करण्यावर भर देण्यात आला आहे.या गुन्ह्याच्या तपासात प्रामुख्याने न्यायवैद्यक शास्त्राचा वापर करण्यात आला आहे.