अहमदनगर :- केंद्र सरकार बहुमताच्या जोरावर संविधानाच्या मूलभूत तत्त्वांवर घाला घालत आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याची कोणतीही आवश्यकता नसताना देशभर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.यामुळे धार्मिक द्वेष वाढीस लागून देशाचे सामाजिक ऐक्य धोक्यात येऊ शकते, असे मत आमदार सुधीर तांबे यांनी व्यक्त केले.
इसळक ( ता. नगर) येथे त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. त्यांनी गावची पाहणी केली. आदिवासी आणि आर्थिक दुर्बल घटकांतील लोकांच्या समस्या व प्रश्न जाणून घेतले.
आमदार तांबे म्हणाले की, भाजपप्रणीत सरकार राज्यघटनेशी छेडछाड करत असून संविधानाचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. इसळक येथील ग्रामसभेने ऐतिहासिक ठराव संमत केल्याने तो लोकशाही व्यवस्थेत क्रांतिकारी ठरणार आहे.
गावचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रावसाहेब शेळके, सरपंच बाबासाहेब गेरंगे, ऍड योगेश गेरंगे, अंकुश शेळके संजय खामकर, सतीश गेरंगे, महादेव गवळी, किरण खामकर, संतोष गेरंगे, मच्छिन्द्र म्हस्के, तुकाराम गेरंगे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधिमंडळातही चर्चा करू
इसळकच्या ग्रामसभेने केलेला ठराव हा पथदर्शी आहे. विधीमंडळात यावर चर्चा करू, आणि पुढील दिशा ठरवू, असे मत आमदार सुधीर तांबे यांनी व्यक्त केले.