Ahmednagar News : नवविवाहितांनो सावधान ! घडतायेत बोगस विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याचे प्रकार, जाणून घ्या सर्वकाही

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News :  नवविवाहितांसाठी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे विवाह नोंदणी. विवाह नोंदणी केल्याने पुढील काही शासकीय किंवा इतर कामे सुलभ होतात.

परंतु अहमदनगर जिल्ह्यात झेरॉक्स टपऱ्यांमधून बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार शेवगाव शहरात सुरु होता व तो शेवगाव ग्रामीण रुग्णालयातील विवाह नोंदणीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला.

हा प्रकार समोर आल्यानंतर डॉ.अमोल जाधव यांनी वरिष्ठांच्या आदेशान्वये शेवगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. विवाह नोंदणीसंदर्भात जनसामान्यांत जागृती व्हावी, कोणीही बोगस विवाह नोंदणी प्रमाणपत्राला बळी पडू नये, असे आवाहन शेवगाव ग्रामीण आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे यांनी केले.

विवाहानंतर विवाह नोंदणी करणे आवश्यक असून, महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम १९९८ व नियम १९९९ आणि परिपत्रकान्वये शहरातील रहिवासी नागरिकांची विवाह नोंदणी ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक वर्ग एक तथा विभाग निबंधक यांच्यामार्फत करता येते. सदर विवाह नोंदणीसाठी शासन निर्णयानुसार विहित कागदपत्रे सादर करून वर-वधू यांनी स्वतः तीन साक्षीदार व पुरोहितासह हजर राहणे आवश्यक असते.

ग्रामीण रुग्णालय वगळता शहरात अन्यत्र कोठेही विवाह नोंदणी होत नाही. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी शहरातून बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर अज्ञात इसमाच्या विरोधात कार्यालयामार्फत तत्काळ पोलिस ठाण्यात रितसर तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसात संबंधित झेरॉक्सचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एजेंट, दलाल किंवा इतर गडबड आढळल्यास..

– शहरातील विवाह नोंदणी केवळ ग्रामीण रुग्णालयातच होते. याव्यतिरिक्त बाहेर कोणतीही व्यक्ती, संस्था, एजंट अगर कोणीही विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑफलाइन अथवा ऑनलाइन अगर स्कॅन करून देत असेल तर ते बेकायदा आहे.

– विवाहानंतर तीन महिन्यापर्यंत ८५ रुपये, तीन महिने ते एक वर्षापर्यंत १३५ रुपये तर एक वर्षानंतर २३५ रुपये, अशी फी आकारण्यात येते. याव्यतिरिक्त कोणताही अधिक खर्च येत नाही. कोणीही व्यक्ती, संस्था,

एजेंट, दलाल म्हणून काम करत असल्यास तसेच रुग्णालयातील कर्मचारी व इतर बाहेरील व्यक्ती पैशाची मागणी करत असल्यास तत्काळ शेवगाव पोलिस ठाणे अथवा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन डॉ. काटे यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe