मोटारसायकल ओढून नेल्याने युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर : हप्ते भरूनही फायनान्स कंपनीच्या एजंटांनी मोटारसायकल ओढून नेल्याने निराश झालेल्या तरुणाने दोन-तीन दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यातून तो वाचला असला, तरी त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या एजंटांवर व त्याची तक्रार न घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्याकडे करण्यात आली आहे.


अशोकनगर फाटा येथे राहात असलेल्या सोनावणे नावाच्या तरुणाने वडिलांच्या नावावर असलेली आपली मोटारसायकल श्रीरामपूर शहरातील शिवाजी रस्त्यावर असलेल्या हरिकमल प्लाझा या इमारतीच्या पार्किंगमध्ये लावली होती. तेथून ती मोटारसायकल गायब झाली. ती चोरीस गेल्याचा संशय आल्याने त्याने शहर पोलीस ठाणे गाठले. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी इमारतीला लावण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही.ची चित्रफित तपासली असता काही अनोळखी इसम मोटारसायकल टोचण करून नेताना आढळून आले. त्यानंतर मोटारसायकल फायनान्स कंपनीच्या एजंटांनी नेल्याचे लक्षात आले.

या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच काही अनोळखी इसम पोलीस ठाण्यात आले. त्यांनी खासगी फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगत वाहनाचे हप्ते थकल्यामुळे मोटारसायकल उचलून नेल्याचे सांगितले. यावर सोनवणे याने पावती दाखवत पैसे भरल्याचे सागितले. मात्र सर्व हप्ते आताच भरावे लागतील असे सांगून गाडी देण्यास एजंटांनी नकार दिला. मात्र अचानक एवढी मोठी रक्कम आणणे शक्य नसल्याने, त्या एजंटांनी अपमानित केल्याने व पोलीस ठाण्यात तीन तास थांबवूनही तक्रार न घेतल्याने व्यथित होऊन तरुणाने त्याच दिवशी आपल्या घरी विषारी औषध प्राशन केले. दोन दिवस त्याच्यावर उपचार करण्यात आले.

यादरम्यान पोलीस रुग्णालयात आलेच नाही. नंतर नागरिकांनी नगरच्या पोलीस नियंत्रण कक्षास कळविल्यानंतर मात्र पोलीस जागे झाले. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर आत्महत्येस प्रवत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी दक्ष नागरिक संघ व राष्ट्र चिन्ह सन्मान कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24