कोपरगावात पतीची आत्महत्या…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कोपरगाव : पत्नीबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर शैक्षणिक व महत्वाची कागदपत्रे घेण्यासाठी पत्नीच्या फ्लॅटवर गेलेला पती गिरीश अशोक अभंग (वय ३०, रा. अन्नपूर्णानगर, कोपरगाव, ह. मु. शिवाजीनगर, गल्ली नं. ५, संगमनेर) याने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना अन्नपूर्णानगर येथे रविवारी (दि. १३) सकाळी दहा ते सायंकाळी पावणेसहा वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी कोपरगाव पोलिसांत पत्नीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनाली भीमराव विधाते, भीमराव सहादू विधाते, संदीप नाना चौरे, दीपाली संदीप चौरे, विकास गाडीलकर (सर्व रा. कोपरगाव) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत महेंद्र अशोक अभंग याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गिरीश अशोक अभंग यांचे भीमराव विधाते (रा. चासनळी, ता. कोपरगाव) यांची मुलगी सोनाली हिच्याबरोबर दि. ९ मार्च २०१४ रोजी विवाह झाला. सोनाली ही महसूल विभागात तलाठी म्हणून नोकरीस होती. त्यामुळे लग्नानंतर सोनाली व गिरीश दोघे कोपरगाव येथे एकत्र राहत होते. गिरीश येवला नाका या ठिकाणी झेरॉक्स व ऑनलाईन सेंटर हे भाडोत्री दुकान चालवित होता. लग्नानंतर एक वर्षापर्यंत त्यांचा संसार बऱ्यापैकी चालला.

दरम्यानच्या काळात त्यांना आत्मेश नावाचा मुलगा झाला. त्यानंतर भाऊ गिरीश हा आम्हाला भेटण्यासाठी संगमनेरला येत असे. त्यावेळी त्याने पत्नी सोनाली ही व्यवस्थित राहत नाही. जास्तीत जास्त वेळ फोनवर बोलत असते. त्यामुळे सदरच्या फोनची चौकशी केली असता ती तहसीलदारांच्या वाहनावरील चालक विकास गाडीलकर याच्याबरोबर बोलत असे. त्यांचे अनैतिक संबंध असल्याचे लक्षात आल्याचे गिरीशने सांगितले होते. हे समजल्यानंतर गाडीलकर हा त्याला भेटला व त्याने आमच्या संबंधावरून तू सोनालीला त्रास देत जावू नको, असे सांगितले. त्यावरून गिरीश व सोनालीचे नेहमी वाद होत असत. त्यानंतर याबाबत सासरे भीमराव विधाते, साळू संदीप चौरे व मेहुणी दीपाली चौरे यांना सांगितले होते. त्यामुळे ते गिरीशला नेहमी म्हणत की, तू सोनालीला त्रास देवू नको.

दरम्यानच्याकाळात मी व माझ्या नातेवाईक संजय शिरसाठ व सुभाष मंडलिक, वडील अशोक अभंग आम्ही भाऊ गिरीश व भावजयी यांना भांडणे न करण्याबाबत तीन ते चार वेळा समजावून सांगितले. त्यानंतरही तिच्या वागण्यात बदल झाला नाही. परिणामी भाऊ गिरीश व भावजयी यांच्यात बैठक होवून संमतीने घटस्फोट घेण्याचे ठरले. गिरीशचे मूळ कागदपत्र सोनालीने परत देण्याचे ठरले. सदर बैठकीला आम्ही हजर होतो. ठरल्याप्रमाणे भाऊ व भावजयी यांनी कोपरगाव येथील न्यायालयात संमतीने घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला.

तो न्यायालयात मंजूर झाला. परंतु, गिरीशचे महत्वाचे कागदपत्रे सोनालीकडे असल्याने तिने घटस्फोटाच्या तारखेच्यावेळी देते म्हणून सांगितले होते. मात्र, तिने न्यायालयात कागदपत्रे आणली नाही. तुम्ही कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी मला सुटी आहे, त्यादिवशी आपल्या फ्लॅटवर येवून कागदपत्रे घेऊन जा, असे सांगितले होते. याची माहिती मला गिरीश याने न्यायालयात सांगितली होती.

त्यानंतर गिरीश हा दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता कोपरगाव येथे कागदपत्रे आणण्यासाठी गेला. त्याने सोनालीला फोन केले. मात्र, तिने ते उचलले नाही. याबाबत त्याने आम्हाला संपर्क साधून सर्व सांगितले. घरी गेल्याशिवाय कागदपत्रे मिळणार नाही, असे म्हणत तो घरी गेला. त्यानंतर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कोपरगाव येथून पोलिसांचा फोन आला की, गिरीश आजारी आहे. तुम्ही कोपरगावला या. त्यानुसार आम्ही सर्व नातेवाईक कोेपरगाव पोलीस ठाण्यात आलो असता गिरीश याने सोनाली विधाते हिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले. 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24