झोपडपट्टीत कोरोना ही धोक्याची घंटा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूने देशासह महाराष्ट्रात थैमान घातले असताना अनेक आवश्यक आरोग्य सुविधा, स्वच्छता व झोपडपट्टीचा उडालेला बोजवारा अशा अनेक गंभीर प्रश्‍नाबाबत सरकारचे डोळे उघडले आहे.

मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनच्या वतीने घरकुल वंचितांना निवार्‍याचा मुलभूत अधिकार मिळण्यासाठी संघटना सातत्याने संघर्ष करीत आहे. हक्काचा निवारा मिळत नसल्याने शहरात झोपडपट्ट्या झपाट्याने वाढत आहे. तर अशा झोपडपट्टया कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर धोक्याची घंटा असल्याचे लक्षात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव संपताच घरकुल वंचितांसाठी घर, निवारा संघर्ष अभियान हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. घरकुल वंचितांना हक्काचा निवारा नसल्याने शहरी भागात अनेक नागरिक झोपडपट्टीत दाटीवाटी करुन राहत आहे. आरोग्यासह झोपडपट्टीधारकांचे अनेक गंभीर प्रश्‍न असतित्वात आहे.

मुंबईच्या धारावीत शिरलेला कोरोना ही संपुर्ण मुंबईच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. मानवतेच्या दृष्टीकोनातून या झोपडपट्टयांचा विकास होण्याची गरज आहे. कोरोना संकटामुळे झोपडपट्टीतील प्रश्‍नाबाबत जागे होण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात आलेली एखादी कोरोनासारखी मोठी आपत्ती कोणालाही माफ करणार नाही.

पंतप्रधान आवास योजना जाहिर करण्यात आली. मात्र किती लाभार्थींना हक्काचा निवारा मिळाला? हा संशोधनाचा विषय आहे. या योजनेखाली फक्त अडीच लाखाचे अनुदान लाटण्यात आले.

कोरोनाने श्रीमंत, गरीब, जाती, धर्म, उच्च-निच्च अशा भिंती देखील नष्ट केल्या असून, मनुष्याने माणुसकीने एकमेकास सहाय्य केल्यास पृथ्वी तळावर सजीव सृष्टीचे असतित्व टिकणार आहे. यासाठी सरकारने निवार्‍याचा मुलभूत अधिकार मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याची भावना अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24