होमिओपॅथी डॉक्टरांना डावलेल्याच्या विरोधात राज्य सरकारचा निषेध : डॉ विजय पवार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर – केंद्र सरकार तर्फे आयुष डॉक्टरांना कोरोना आजारा संदर्भात अत्यावश्यक ऑनलाईन ट्रेनिंग देण्याचा निर्णय झाला होता. राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी हे ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. याचा उद्दिष्ट केवळ राज्यातील कोरोना रुग्णांची सेवा करणे व साथ आटोक्यात आणण्यासाठीच्या उपयोजनांमध्ये या ट्रेनिंगद्वारे प्रशिक्षित डॉक्टरांच्या नेमणूका करणे हा होता.

याद्वारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय सेवा बळकट करून ही साथ प्रभावीपणे रोखणे हे धोरण आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने आयुष मधील केवळ आयुर्वेद व युनानी डॉक्टरांनाच या कामी मेडिकल ऑफिसर हे पद भरती सुरू केली आहे. मात्र यावेळी त्यांना राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांचा पुर्णपणे विसरच पडला आहे.

हा अन्याय प्रथम झालेला नाही. तर गेल्या तीस वर्षात वारंवार ज्यावेळी आयुष साठी मेडिकल ऑफिसर पद भरती निघालेली आहे, त्या त्या वेळी केवळ राज्यातील शासन यंत्रणेने व राजकीय नेत्यांनी ती पदे फक्त आयुर्वेद व युनानी डॉक्टरांनाच दिलेली आहेत. जाणीवपूर्वक होमिओपॅथी डॉक्टरांना ही पदे दिली जात नाहीत.

या पाठीमागे मोठे षडयंत्र आहे, हे वारंवार सिद्ध होत आहे. वर्षानुवर्ष होणार्‍या या अन्याया विरोधात संघटनेतर्फे राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्याकडे दिनांक 25 फेब्रुवारी रोजीच लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सुद्धा एप्रिल मध्ये ऑनलाईन ट्रेनिंग घेऊनही कोरोना साथ रोखण्यासाठी प्रचंड ईच्छाशक्ती व सरकारला मदत करण्याची तयारी असून सुद्धा होमिओपॅथी डॉक्टरांना या नौकरीसाठी नाकारले जाते ही गंभीर बाब आहे.

संपुर्ण राज्यातील नोंदणीकृत 73 हजार व अंतर निवासी आणि कॉलेजमधील विद्यार्थी अशा एक लाखापेक्षाही जास्त होमिओपॅथी डॉक्टरांनी हे ऑनलाईन ट्रेनिंग घेतले आहे. परंतु त्यामधील एका ही डॉक्टरला राज्य सरकारने या सेवेमध्ये घेतले नाही. हा प्रचंड मोठा धोका होमिओपॅथी डॉक्टरांसोबत झाला आहे.

म्हणूनच राज्यातील प्रत्येक होमिओपॅथी डॉक्टरांची हीच भावना आहे की, ठाकरे सरकारने आम्हांला तातडीने ट्रेनिंग पूर्ण करावयास लावून, अडचणीच्या काळात जनसेवेसाठी नोकरी नाकारून आमची घोर फसवणूक केली आहे.

या अन्यायाविरोधात आणि डॉक्टरांचे हित जपण्यासाठी महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर कृती समिती राज्य सरकारचा जाहीर निषेध करत आहे. असे प्रतिपादन राज्याचे अध्यक्ष डॉ. विजय पवार यांनी केले.

अहमदनगर लाईव्ह 24