नगर: शहरातून भाजपची उमेदवारी करण्यासाठी चार जण इच्छुक असल्याचे सांगितले जाते. महापालिका सत्तेतील भाजपचे पहिले महापौर बाबासाहेब वाकळे, नगरचे माजी खासदार दिलीप गांधी, मागील २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार असलेले अॅड. अभय आगरकर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड या चौघांची नावे चर्चेत आहेत.
यंदाच्या लोकसभेच्या तिकिटाच्या शर्यतीत गांधी व बेरड यांची नावे होती. पण या दोघांनीही तिकीट नाकारून काँग्रेसमधून आलेल्या डॉ. सुजय विखेंना ते दिले गेले. पण गांधी व बेरड यांना या बदल्यात पक्षाकडून काही शब्द दिल्याचे सांगितले जाते.
त्या शब्दानुसार नगरच्या जागेसाठी त्यांनी दावेदारी केली आहे व श्रेष्ठींपर्यंतही पोहोचवली आहे. तर दुसरीकडे मागील विधानसभा निवडणुकीत ३९ हजार मते घेतली असल्याने त्याबळावर यंदाच्या उमेदवारीचे प्रयत्न पुन्हा अॅड. आगरकरांचे असल्याचे सांगितले जाते.
तर महापालिका स्थापन होऊन १५ वर्षांत पहिल्यांदा सर्वपक्षीयांना साथीला घेऊन भाजपला महापौरपद मिळवून दिल्याने आमदारकीला संधी मिळावी, अशी अपेक्षा वाकळेंची आहे. पक्षीय व अन्य पक्षीय ताकद आपल्या मागे असल्याचा दावाही त्यांचा आहे. त्यामुळेच भाजपच्या मंगळवारच्या मुलाखतींच्या वेळी नगरमधील इच्छुक सर्वाधिक चर्चेत असणार आहेत.