सरकारने राष्ट्रीय आदिवासी आरोग्य मिशन आणि कृती आराखडा तयार करावा – डॉक्टर अभय बंग

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- आदिवासींच्या आरोग्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधन अहवालाच्या आधारे सरकारने राष्ट्रीय आदिवासी आरोग्य मिशन आणि कृती आराखडा तयार करावा अशी अपेक्षा पद्मश्री डॉक्टर अभय बंग यांनी व्यक्त केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित ट्रायबेकॉन या परिषदेत ते बोलत होते.

प्रवरा मेडिकल ट्रस्ट ने आदिवासी विकास मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटना आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण विभाग यांच्या सहयोगाने या तीनदिवसीय परिषदेचं आयोजन केलं आहे. कृती आराखड्याअंतर्गत १ हजार प्रशिक्षित आदिवासी आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करुन आरोग्य सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी भागात अंमलबजावणी करावी असंही त्यांनी सुचवलं

फार मोठ्या काळासाठी दुर्लक्षित राहिलेला आदिवासी समाज आगामी काळात वगळला जाऊ नये यासाठी प्रबळ इच्छाशक्तीने सर्वसमावेशी प्रयत्न करण्याची गरज आहे असं डॉक्टर बंग यावेळी म्हणाले. आदिवासींची आरोग्यविषयक सद्यस्थिती दर्शवणाऱ्या बालमृत्यू दराबाबतच्या भारताच्या आकडेवारी संदर्भात त्यांनी चिंता व्यक्त केली.

आदिवासी विभागात आरोग्य विषयक सुविधांची गरज प्रचंड मोठी असून अशा भागात काम करण्याची इच्छाशक्ती नसल्यामुळे या लोकांना सुविधांपासून वंचित राहावं लागतं ही आजची वस्तुस्थिती असल्याचे ते म्हणाले. आदिवासींच्या आरोग्यासाठी उपाय योजना राबवत असताना त्यांच्या गरजा आणि मागण्या जाणून घेऊनच काम केले पाहिजे असेही ते म्हणाले.

कोणत्याही प्रकारचे संशोधन हे आपल्यापुरतं किंवा कागदोपत्री नं राहता लोकाभिमुख असावं. लोकांसाठी संशोधन करताना ते त्यांच्यातच जाऊन केले पाहिजे..पुण्या-मुंबईसारख्या विकसित शहरांमध्ये आदिवासी कल्याणाच्या संस्थात्मक यंत्रणा काहीतरी निर्णय घेतात मात्र त्याचे लाभ दुर्गम भागात खऱ्याअर्थाने पोहोचतच नाहीत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

प्रत्यक्ष संवाद साधूनच त्यांच्या गरजा आणि मागण्या समजू शकतात. आदिवासींच्या जीवनशैलीला मागास किंवा कमी लेखून आपली व्यवस्था त्यांच्यावर लादणे चुकीचं असल्याचेही ते म्हणाले. ‌कुपोषण, मातामृत्यू, बालमृत्यू या आदिवासींच्या प्रमुख समस्या आहेत.

त्यांच्या समस्यांचे प्राधान्यक्रम आपण जाणून घेतले पाहिजेत. पारंपरिक उपचारांवर असलेला आदिवासींचा दृढ विश्वास आणि श्रद्धा नं दुखावता त्यांना या पद्धतीच्या मर्यादा समजावून सांगणं गरजेचं आहे. त्यांना शिक्षित आणि सक्षम बनवण्यासाठी जनजागृती केली पाहिजे. सुधारणांच्या या प्रक्रियेत प्रत्यक्ष आदिवासींनाच सहभागी करून घेऊन त्यांना आरोग्य प्रशिक्षण दिलं पाहिजे.

पारंपरिक दाई / वैदू यांच्याच सहकार्यातून वैद्यकीय सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. आदिवासींच्या नैसर्गिक औषधोपचार पद्धतींवर सखोल संशोधन होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आदिवासी पुरूषांमध्ये मद्य आणि तंबाखूच्या व्यसनाधीनतेचं प्रमाण अधिक असून हे अकाली मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं.

देशभरात जवळपास अकरा कोटींच्या संख्येने असलेले हे आदिवासी ७०५ विविध आदिवासी जमातींमध्ये विखुरले गेले आहेत. या आकडेवारीच्या तुलनेत आरोग्यसेवेची यंत्रणा तुटपुंजी पडत आहे. सुशिक्षित- प्रशिक्षित लोकांमध्ये दुर्गम भागात जाऊन कार्य करण्याच्या इच्छाशक्तीचा प्रचंड अभाव आहे.

यामुळे आदिवासी आरोग्यासाठी संशोधन करणे ही आव्हानात्मक गोष्ट आहे. मात्र ट्रायबेकॉन च्या माध्यमातून साडेतीनशेहून अधिक लोक या कार्यासाठी पुढे येत आहेत ही बाब अत्यंंत आशादायी आहे असं मत डॉक्टर बंग यांनी व्यक्त केलं. गडचिरोली परिसरात सर्च Society for Education, Action and Research in Community Health राबवत असलेल्या उपक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली..

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24