नीलेश लंके अधिवेशनाला गैरहजर, चर्चा तर होणारच…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : विधानसभेच्या आधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार असतानाही राष्ट्रवादीचे काही आमदार गैरहजर होते. त्यातील काहींच्या गैरहजेरीला तशी सबळ कारणे होते.

मात्र, त्यामध्ये नगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघातील आमदार नीलेश लंके यांच्या गैरहजेरीची मात्र जोरदार चर्चा सुरू आहे. लंके आजारी असल्याने रुग्णालयात दाखल आहेत, त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत, असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

मात्र, संपूर्ण कोरोना काळात हिमतीने काम करणारा हा नेता आता ऐनवेळीच कसा आजारी पडला, याची चर्चा सुरू झाली आहे.महत्वाचे कामकाज असल्याने आणि त्यातून पुढील राजकारणाची गणिते ठरणार असल्याने सभागृहातील उपस्थितीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

त्यामुळेच कोरोनचा अहवाल निगेटीव येतात अजित पवार अधिवेशात हजर झाले. मात्र, गैरहजर राहणाऱ्या आमदारांमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या मोठी होती. नवाब मलिक व अनिल देशमुख तुरुंगात आहेत. दत्तात्रेय भरणे यांच्या आईचे निधन झाले आहे.

त्यामुळे त्यांची गैरहजेरी अपेक्षित होती. दिलीप मोहिते आधीपासूनच नाराज आहे. अण्णा बनसोडे आणि बबनदादा शिंदे हेही गैरहजर होते.यात ठळकपणे गैरहजेरी जाणवली ती पारनेरचे आमदार नीलेश लंके यांची. लंके पूर्वी शिवसेनेत होते.

त्यावेळी विजय औटी यांच्याशी त्यांचे मतभेद झाले होते. त्यांनी शिवसेनेकडून पारनेरची उमेदवारी हवी होती. मात्र, तेव्हा ती देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि विजयी झाले. त्यानंतर ते खुद्द शरद पवार आणि अजित पवार यांचे अत्यंत नीकटवर्तीय बनले.

स्वत: पवार यांनी त्यांच्या घरी भेट दिली आहे. त्यांच्या कामाचे कौतूक केले आहे. एवढेच काय तर त्यांना आता नगर लोकसभा मतदारसंघाचील राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाऊ लागले आहे.

अशा परिस्थितीत त्यांनी आज अधिवेशनाला दांडी मारली. पक्षासाठी एक एक मत महत्वाचे असल्यावेळी आणि एकजूट दाखविण्याची वेळ असताना लंके यांची गैरहजेरी खटकली. त्यांच्याकडून ते आजारी असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यांच्या या कृतीमागे काही राजकीय कारण तर नाही ना? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

कोरोना काळात कोविडसेंटर मध्ये विना मास्क वावरणारे, सतत लोकांमध्ये कार्यरत असणारे लंके नेमके अशावेळी एवढे गंभीर अजारी कसे पडले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील नेवाशाचे अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी आजारी असतामाही उपस्थित राहून ठामपणे शिवसेनेला मतदान केले, याचीही चर्चा आहे.