अहमदनगर बातम्या

निळवंडे ! 8 कोटी खर्चाचे धरणाचा खर्च झाला 2 हजार कोटीहून अधिक

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- उत्तर नगर जिल्ह्यातील निळवंडे धरण 1970 मध्ये आठ कोटी खर्चाचे धरण होते मात्र पन्नास वर्षानंतर हेच धरण 2 हजार 370 कोटींवर गेले.

आज अखेर प्रकल्पासाठी 1 हजार 700 कोटी खर्च झाले आहेत तर उर्वरित कामांसाठी आणखी 590 कोटींची गरज आहे. जून 2022 मध्ये विभागाकडून मुख्य कालवे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

परंतु शेवटच्या शेतकर्‍यापर्यंत पाणी नेणारी वितरण व्यवस्था पुन्हा निधीच्या भरवशावर राहणार आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील राहाता, संगमनेर, राहुरी, कोपरगाव, अकोले, श्रीरामपूर या सहा तालुक्यांतील 182 जिरायती गावामधील 68 हजार हेक्टर शेती सिंचनासाठी निळवंडेची निर्मिती झाली.

1970 साली आठ कोटींचा असणारा हा प्रकल्प पन्नास वर्षांनंतर 2 हजार 370 कोटींवर गेला. निधीची टंचाई वाढलेले दर यामुळे राहिलेल्या कामासाठी जलसंपदा विभागाकडून तयारी सुरू आहे.

या कामासाठी 2 हजार 15 कोटी म्हणजेच 1290 कोटीची वाढीव सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यावी लागाणार आहे. धरणाचे काम पूर्ण होऊन त्यामध्ये 2008 पासून पाणी साठविले जात आहे.

कालव्यांअभावी ते लाभक्षेत्रातील शेतीला मिळत नाही. पुढील वर्षी जून 2022 पर्यंत धरणाच्या दोन्ही मुख्य कालव्यांचे काम पूर्ण करण्याचे विभागाचे नियोजन आहे.

वेळेवर अपेक्षीत निधी मिळाल्यास वितरण व्यवस्था पूर्ण होण्याला 2024 उजाडणार आहे. त्यासाठी पुढील तीन वर्षात प्रतीवर्षी पाचशे कोटींची गरज आहे. मात्र गेल्या पन्नास वर्षांच्या निधीचा इतिहास पाहता निधी उपलब्धतेबाबत साशंकताच व्यक्त होत आहे.

Ahmednagarlive24 Office